Tue, Jun 02, 2020 13:24होमपेज › Nashik › शबरी महामंडळाला ‘अच्छे दिन’

शबरी महामंडळाला ‘अच्छे दिन’

Published On: Aug 29 2019 9:07AM | Last Updated: Aug 28 2019 10:50PM
नाशिक : प्रतिनिधी

गेल्या साडेचार वर्षांपासून बंद असलेल्या शबरी महामंडळाचे लवकरच पुनरुज्जीवन होणार आहे. महामंडळाला पतपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरूपात निधी मिळण्यासाठी राज्य शासनाने 50 कोटींची हमी घेतली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

अनुसूचित जमातीमधील बेरोजगार तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता शबरी आदिवासी महामंडळाकडून अल्प व्याजदरात कर्जपुरवठा करण्यात येत होता. सन 2008 पूर्वी राज्यातील पाच हजारांहून अधिक बेरोजगारांना 82 कोटींपर्यंत कर्जाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, कर्जवसुली करण्यात महामंडळाला यश आले नाही. तर 2008 मध्ये शासनाने 23 कोटी 26 लाखांची कर्जमाफी देण्यात आली. त्यामुळे महामंडळ डबघाईस आले होते. शबरी महामंडळातर्फे 2011-12 पासून विभागाचे लेखापरीक्षणही न झाल्याने तसेच शासनाकडूनही हमी घेतली जात नसल्याने राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाने शबरीचा वित्तपुरवठा खंडीत केला. त्यामुळे 2014 पासून शबरीचे कर्जवाटप ठप्प होते. आता शासनाने हमी घेतल्याने आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, यापुढे कर्जवाटपाचे काम ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे. महिला सबलीकरण योजनेसाठी 50 हजार अवघ्या चार टक्के, अल्प मुदतीचे साडेसात लाखांचे कर्ज  सहा टक्के, बंद पडलेल्या उद्योगांना चालना देणे, वनधन योजना तसेच पूर्वीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहेे. कर्जवाटपमध्ये महिला सबलीकरण योजनेला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कर्जवाटपात सावधानता बाळगणार

कर्जाची वसुली होत नसल्याचा अनुभव असल्याने नव्याने देण्यात येणार्‍या कर्जवाटपात विशेष सावधानता बाळगली जाणार असल्याचे शबरी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अल्पमुदतीचे कर्ज देताना जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी विशेष अधिकार्‍यांची नेमणूकही करण्यात येणार आहे.