Fri, Jun 05, 2020 13:54होमपेज › Nashik › लष्करी अधिकार्‍याकडून प्रशिक्षणार्थ्याचा लैंगिक छळ

लष्करी अधिकार्‍याकडून प्रशिक्षणार्थ्याचा लैंगिक छळ

Published On: Jul 24 2019 1:40AM | Last Updated: Jul 24 2019 1:40AM
चेहेडी : वार्ताहर 

नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये लष्करात सुभेदार असलेल्या अधिकार्‍याने एका प्रशिक्षणार्थी युवकाचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित जवानाने उपनगर पोलिसांत तक्रार दाखल केल्याने संबंधित अधिकार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव येेथे राहणारा 19 वर्षीय युवक आर्टिलरी सेंटरमध्ये दि.22 एप्रिल2019 पासून प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे. या दरम्यान पाच ते सहा प्रशिक्षणार्थी जवानांचीजेसीओकडे सेवक म्हणून नेमणूक केली जाते. यापैकी पीडित प्रशिक्षणार्थीकडे जेसीओ सुभेदार महेश पांडे यांच्याकडे सेवक म्हणून नेमणूक केली होती.

वरिष्ठांच्या आदेशानुसार पीडित जवान पांडे यांच्या निवासस्थानी गेला असता, महेश पांडे झोपलेले होते. त्यानंतर त्यांनी पीडित जवानास  पाय दुखत असून मालीश करण्यास सांगितले. साहेबांच्या आदेशानुसार जवानाने त्यांची मालीश करण्यास सुरुवात केली असता, पांडे यांनी जवानाशी अश्‍लील चाळे करत जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आश्‍वासनही दिले. तसेच याबाबत बाहेर वाच्यता केल्यास प्रशिक्षण कालावधी वाढवून देईल, असा सज्जड दमही दिला. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारे संबंधित जवानावर दुसर्‍यांंदा अत्याचार केला.

दरम्यान, दुसर्‍यांदा पीडित जवानाचा सहकारी पांडे यांच्या निवासस्थानी आला असता पांडे यांनी पीडित युवकास पलंगाखाली लपण्यास सांगितले. या घटनेनंतर पीडित जवानाने सुभेदार मुकेश कुमार यांना झालेला प्रकार कथन केला. त्यांनी वरिष्ठ कमांडर यांना कळवले. वरिष्ठांनी पीडित जवानाकडून माहिती घेऊन लष्करी रुग्णालयात दाखल केले. या घटनेप्रकरणी संबंधित जवानाने पांडेविरुद्ध उपनगर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल केला आहे.