Fri, Jun 05, 2020 13:59होमपेज › Nashik › सतीश चिखलीकर लाच प्रकरणाचा आज निकाल 

सतीश चिखलीकर लाच प्रकरणाचा आज निकाल 

Published On: Aug 26 2019 1:48AM | Last Updated: Aug 25 2019 11:18PM
नाशिक : प्रतिनिधी

ठेकेदाराकडून 22 हजार रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिल 2013 मध्ये अटक केली होती. या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली असून सोमवारी (दि.26) न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात निकाल लागण्याची शक्यता आहे. 

लाच घेतल्यानंतर चिखलीकर आणि वाघ यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अपसंपदा सापडल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड झाल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

ठेकेदाराचे 3 लाख 69 हजार रुपयांचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 एप्रिल 2013 रोजी सापळा रचून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विभागाने तपास करून सुमारे 2 हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान, चिखलीकर यांच्याकडे 14 कोटी 66 लाख 17 हजार 646 रुपयांची अपसंपदा आढळून आली. सुनावणी दरम्यान, जुलै 2018 मध्ये न्यायालयातून लाचखोर प्रकरणातील मूळ तक्रारच गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला. संशयितांनी मुळ तक्रार लंपास करीत त्याऐवजी बनावट तक्रार ठेवली होती. तक्रारीतील मजकूरही बदलण्यात आला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ तक्रार गहाळ झाल्याने चिखलीकर प्रकरण पुन्हा उजेडात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच लाच प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली आहे. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी कामकाज पाहिले. सोमवारी या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता न्यायालयीन सूत्रांनी वर्तवली आहे.