नाशिकच्या उमरणेत सरपंच होण्यासाठी लागली तब्बल २ कोटींची बोली; आयोगाने निवडणूकच केली रद्द  

Last Updated: Jan 14 2021 12:18PM
नाशिक : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार आता थंडावला आहे. त्यामुळे आतल्या अंगाने पाठिंबा, समर्थन मिळवण्यासाठी, 'मॅनेज' करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे. पण, नाशिक आणि नंदुरबारमधील या मॅनेज करण्याच्या संस्कृतीचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तेथील दोन गावातील निवडणूकच आयोगाने रद्द केली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील उमरणे गावात सरपंचपदासाठी तब्बल २ कोटी रुपयांची बोली लागल्याची माहिती समोर आली. असाच प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील खोंडमाळी गावात घडला. तेथेही सरपंच पदासाठी ४२ लाख रुपयांची बोली लागली होती. या घटनांबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर तसेच याचे व्हिडिओ हाती लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या दोन गावांतील १५ जानेवारीला होणारी निवडणूकच रद्द केली.