Wed, Jun 03, 2020 00:13होमपेज › Nashik › सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला मिळेना ग्रामसेवक

सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला मिळेना ग्रामसेवक

Published On: Aug 18 2019 1:29AM | Last Updated: Aug 18 2019 1:29AM
सप्तशृंगगड : वार्ताहर

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक मिळत नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगगड महाराष्ट्राचे अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. या देवस्थानाला महाराष्ट्र शासनाने ‘ब’ वर्ग दर्जा दिलेला आहे. त्यासाठी 25 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या तीर्थक्षेत्रासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली निधीचे नियोजन केले जाते. पण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने या निधीचे नियोजन किंवा नियंत्रणासाठी शासन प्रतिनिधी नसल्याने गडावरील ग्रामस्थांना ‘ग्रामसेवक देता का ग्रामसेवक’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

विकासासाठी विविध प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामसेवकाचा मोठा सहभाग असतो. पण ग्रामसेवकाअभावी विविध प्रस्ताव, शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांची अडवणूक होते. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेलाही ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्याने विविध ठराव करण्यास अडचण निर्माण झाली आहे.

शासन एकीकडे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. पण, ग्रामसेवक नसल्याने विविध प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामसेवकाचा मोठा सहभाग असतो. यापूर्वीच ग्रामसेवक जाधव या ठिकाणी येण्यास नाखूश असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. याबाबत कळवणचे गटविकास अधिकारी, शासकीय अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न पडतो.