पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या कृष्णनगर येथील प्रचार कार्यालयास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शुक्रवारी (दि.११) रोजी सकाळी साडेदहा वाजता भेट दिली. शिवसेना आणि भाजपची युती असताना राऊत यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सानप यांची भेट घेतल्याने या मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभेच्या प्रचाराला वेग येत असताना महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांच्या प्रचार कार्यालयात जाऊन भेट घेणे. त्यात ऐन निवडणुकीच्या काळात बंद खोलीत चर्चा झाल्याने ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. राऊत हे सानप यांच्या कार्यालयात येणार असल्याचे कळताच सानप यांनी प्रचार रॅलीतून वेळ काढीत प्रचार कार्यालयाकडे जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीप्रसंगी सानप यांनी राऊत यांचा सत्कार केला. सानप यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करणाऱ्या सानप यांच्या या भेटीने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या भेटीप्रसंगी माजी आमदार जयंत जाधव, शिवसेनेचे नाशिक महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.