Tue, Nov 19, 2019 13:59होमपेज › Nashik › राज्य कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच वेतन

राज्य कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच वेतन

Last Updated: Oct 16 2019 1:14AM
नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीच्या आतच वेतन द्यावे म्हणून पुन्हा एकदा वित्त विभागाने परिपत्रक काढले आहे. चार दिवसांत दोनदा निर्णय फिरविण्याची वेळ या विभागावर आली. मात्र, दिवाळीपूर्वीच ऑक्टोबरचे वेतन मिळणार असल्याने कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. 

येत्या 25 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशीने दिवाळीस सुरुवात होत आहे. सण साजरा करण्यासाठी कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यात यावे, असे परिपत्रक वित्त विभागाने 9 ऑॅक्टोबरला काढले होते. या निर्णयाने कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच हा निर्णय स्थगित करण्यात आला.

कोषागारातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने दिवाळीआधी वेतन करणे शक्य होणार नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. वित्त विभागाच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. हाती पैसे नसतील तर सण साजरा करणार कसा, अशा विवंचनेत कर्मचारी होते. मात्र, वित्त विभागाने पुन्हा एकदा नव्याने परिपत्रक काढले असून, 

25 ऑक्टोबरच्या आतच वेतन करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेला हे परिपत्रक नुकतेच प्राप्त झाले असून, विवंचनेत असलेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.