Fri, Jul 10, 2020 08:28होमपेज › Nashik › आधी मनमानी कारभार; आता जुन्या इमारतीचा आधार

आधी मनमानी कारभार; आता जुन्या इमारतीचा आधार

Published On: Jul 09 2019 1:18AM | Last Updated: Jul 09 2019 12:08AM
नाशिक : प्रतिनिधी

नोकरभरती असो की, बेसुमार कर्जवाटप, असा प्रकारचा मनमानी कारभार हाकला गेल्यानेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला घरघर लागली असताना यापासून लपण्यासाठी कारभार्‍यांनी जुन्या इमारतीचा आधार घेतला आहे. आता जुन्या इमारतीत स्थलांतर झाल्याने खरोखरच बँकेला जुने दिवस परत येतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

शेतकर्‍यांची अर्थवाहिनी समजली जाणारी जिल्हा बँक गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. खात्यात पैसे भरणे तर दूरच पण, जे आहे तेच काढून घेण्यावर सभासदांची धावपळ सुरू आहे. दुसरीकडे अडीच हजार कोटी रुपयांच्यावर कर्ज थकीत तेही एक कारण बँकेला संकटात नेण्यास पुरेसे ठरले आहे. पण, यातही संचालक मंडळाचा कारभार बँकेला खड्ड्यात घालणारा ठरला. संचालक मंडळाने 2016 मध्ये  1,720 कोटी रुपयांचे कर्जवाटप करताना बँकेच्या तिजोरीचा विचार केला नाही. विशेष म्हणजे, काही विशिष्ट तालुक्यांमध्येच अधिक कर्जवाटप करण्यात आले.

म्हणजे, अवाजवी वाटप झालेले कर्ज तिजोरीवर भार ठरले आणि बँकेच्या मागे साडेसाती सुरू झाली. नोकरभरती, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी, सुरक्षारक्षक भरती, न्यायालयीन लढाईसाठी बँकेच्या तिजोरीतून झालेला खर्च अशा प्रकारचा मनमानी कारभारही बँकेला संकटात नेणारा ठरला. म्हणजे त्या-त्यावेळी संचालक मंडळाने घेतलेले निर्णयच बँकेला खड्ड्यात घालणारे ठरले. नोटाबंदीच्या निर्णयाने तर त्यात भर घातली.  जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने आठ महिने लावल्याने दैनंदिन व्यवहारासाठीही तिजोरीत पैसे नव्हते. सभासदांना खात्यातील पैसे मिळत नसल्याने बँकेच्याविरोधात रोष निर्माण झाला. त्यामुळे खात्यात पैसे भरणार्‍या सभासदांचे प्रमाण अत्यल्प झाले. आपल्याच खात्यातील पैसे मिळत नसल्याने बँकेबद्दल विश्‍वास डळमळीत झाला. म्हणजे, मनमानी पद्धतीने हाकलेला कारभारच आजच्या स्थितीला कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.

मात्र, हे वास्तव नजरेआड करून कारभार्‍यांनी बँकेचे मुख्यालय द्वारकेजवळील नव्या इमारतीतून पुन्हा जुन्या इमारतीत स्थलांतरित केले आहे. कामकाजासाठी जागा अपुरी पडल्याचे कारण त्यामागे दिले आहे. प्रत्यक्षात मात्र अंधश्रद्धेच्या आहारी जाऊनच स्थलांतराचा निर्णय घेण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नव्या इमारतीतच बँकेला घरघर लागल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. स्थलांतरावरून टीकेला सामोरे जावे लागू नये म्हणून नव्या इमारतीत संगणक शाखा, लेखा विभाग कार्यरत ठेवण्याची सावधगिरी बाळगण्यात आली आहे. मनमानी कारभार कायम ठेवून बँकेला जुन्या इमारतीत खरोखरच स्थैर्य लाभणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.