Wed, Jan 20, 2021 09:39होमपेज › Nashik › रोहित पवारांमागेही ‘ईडी’चा ससेमिरा लागणार : सोमय्या

रोहित पवारांमागेही ‘ईडी’चा ससेमिरा लागणार : सोमय्या

Last Updated: Oct 17 2019 1:47AM
नाशिक : प्रतिनिधी

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीत रोहित पवार यांचेही नाव असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रोटोकॉल ठरलेला असून, मोदींची सर कोणालाही येणार नाही, असा चिमटा त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला. 

काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे मोठे पक्ष वेगाने अदृश होत असल्याचे सांगत, राज्यात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.

राज्य सहकारी बँकेने अवसायनात काढलेले साखर कारखाने लिलाव प्रक्रियेत विकत घेण्याचे काम पवार कुटुंबीयांनी केले. त्यासाठी एकाच प्रवर्तकाच्या नावे विविध कंपन्यांमार्फत निविदा भरण्याचे काम करण्यात आले. यातील एका कंपनीचे संचालक रोहित पवार असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला. 

रिझर्व्ह बँक, कॅग व नाबार्डच्या अहवालातून हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे सांगत, भविष्यात रोहित पवार यांच्याही मागे ईडी चौकशीचा फेरा लागण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या सत्तेची तुलना केल्यास गेल्या पाच वर्षांतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अधिक चांगले काम केल्याचे ते म्हणाले. राज्यातील जलसिंचन घोटाळ्या प्रकरणी पाच वर्षांत कारवाईचे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु, ते पूर्ण न झाल्याबद्दल सोमय्यांनी क्षमा मागताना उच्च न्यायालयात या प्रकरणी योग्य ती कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

मनसेकडे पैसा येतो तरी कोठून?

एखादा पक्ष चालवायचा म्हटले की पैसा लागतो. मात्र, सध्या या पक्षाकडे पैसा येतो तरी कोठून, असा सवाल करून राजकारणाच्या क्षितिजावरून लवकरच मनसे अदृश होईल, असा उपरोधिक टोला सोमय्या यांनी लगावला.