Wed, Jun 03, 2020 20:43होमपेज › Nashik › चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी ११११ वृक्ष लावण्याचा संकल्प

चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी ११११ वृक्ष लावण्याचा संकल्प

Published On: Aug 02 2019 5:46PM | Last Updated: Aug 02 2019 6:56PM

चांदवड (नाशिक) : वृक्ष लागवड करताना गुड मॉर्निंग ग्रुपचे कार्यकर्तेचांदवड (नाशिक) : प्रतिनिधी 

श्री चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी ओस पडलेल्या डोंगर टेकडीवर १ हजार १११  वृक्ष लावण्याचा संकल्प शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी दररोज सकाळच्या सुमारास वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

 चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर टेकडीवर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केल्याने परिसर ओस पडला आहे. यामुळे डोंगर परिसरातील वृक्षाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. पर्यायाने पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. यासाठी डोंगर परिसरात पुन्हा वृक्षांची वाढ व्हावी यासाठी चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य १ हजार १११ वृक्षांची लागवड करणार आहेत. या वृक्ष लागवडीची सुरवात शुक्रवार (दि.२) रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आली. पहिल्या दिवशी ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात वड, पिंपळ, सिताफळ, बेहडा, करंज, आवळा ह्या झाडांची लागवड करण्यात आली. उर्वरित वृक्षांचे रोपण दररोज सकाळच्या सुमारास करण्यात येणार आहे. वृक्षांची नुसती लागवड न करता त्यांचे जोपासन व संगोपन करण्याचा निर्धार देखील या ग्रुपने घेतले आहे.

यावेळी चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक संजय पाटील, उपवनसंरक्षक नितीन कुमार, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, मनोज शिंदे, शरद ढोमसे, संतोष देवरे, मधुकर पेंढारी, निलेश डुगरवाल, प्रविण हेडा, पारसशेठ, कैलास कोतवाल, संदीप राऊत, आदिसह वनविभागाचे कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.

प्रदीप पाटील, तहसीलदार चांदवड

चांदवड शहराला लाभलेलं सर्वात मोठे वैभव म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगा परंतु गेल्या काही वर्षांमध्ये झालेली वृक्षतोड व त्यामुळे बोडके होत जाणारे डोंगर व पर्यायाने कमी होत जाणारे पर्जन्यमान या अनुषंगाने टेकडीवर रोज फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग ग्रुपच्यावतीने वृक्षलागवड व संवर्धन करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे त्यामध्ये चांदवड शहरातील व तालुक्यातील नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेता येणार आहे ज्यांना प्रत्यक्ष सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी रोज येऊन झाड लावावे व झाडांचे संगोपन करावे ज्यांना शक्य नाही त्यांनी मॉर्निंग ग्रुपला रोपे उपलब्ध करून द्यावी किंवा संगोपनासाठी आवश्यक साहित्य जसे कुदळ, फावडी, घमेली, ड्रिप इरिगेशन सिंटेक्स, टाक्या, खते यासारख्या रूपाने सुद्धा आपण वृक्षसंवर्धनासाठी या मोहिमेत सहभागी होऊ शकतात चला तर निसर्गरम्य व पर्यावरणपूरक चांदवड निर्मितीत सहभागी होऊ या .