Tue, May 26, 2020 12:55होमपेज › Nashik › कांदा साठवणुकीचा निर्णय मागे घ्यावा

कांदा साठवणुकीचा निर्णय मागे घ्यावा

Published On: Oct 02 2019 1:40AM | Last Updated: Oct 02 2019 1:40AM
नाशिक : प्रतिनिधी

सरकारने कांदा साठवणूक करण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे व्यापार करणे अशक्य झाले आहे.  या निर्णयामुळे व्यापार्‍यांचे नुकसान होणार आहे. सरकारच्या मर्यादेमुळे व्यापारी खरेदी करण्यासाठी फिरकणारदेखील नाहीत. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे साकडे कांदा व्यापार्‍यांनी सोमवारी (दि.1) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना घातले. 

कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणूकीवर मर्यादा आणताना निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यानुसार छोट्या व्यापार्‍यांना 10 ते मोठ्या व्यापार्‍यांना 50 टनापर्यंत कांद्याची साठवणूक करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात जिल्हा कांदा व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन म्हणणे मांडले. या भेटीत काही व्यापारी दिवसाला 50 टनाहून अधिक कांदा खरेदी करतात. परंतु, हा कांदा तातडीने बाजारात पाठविणे शक्य नसते. या सर्व प्रक्रियेत एक-दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे कारवाईच्या धसक्याने कोणताही व्यापारी कांदा खरेदी प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत. तसेच व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट होते हा भ्रमदेखील सरकारने डोक्यातून काढून टाकावा, असे व्यापार्‍यांनी यावेळी नमूद केले. 

सरकारने कांदा बंदीबद्दलचा निर्णय लागू करताच जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला तर लासलगावसह काही बाजार समित्यांमध्ये लिलावदेखील बंद ठेवण्यात आले. परिणामी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली. या सर्व घडामोडीत केवळ कांद्याची साठेबाजी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णंय घेतला आहे. त्याचा विपर्यास करण्यात आल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या निर्णयातून कोणताही शेतकरी, व्यापारी अथवा ग्राहकांचा नुकसान होवो, असा कोणताही हेतू नसल्याचे मांढरे यांनी सांगितले.