Tue, Jun 02, 2020 14:01होमपेज › Nashik › नाल्यांवरील बांधकामांचा मागविला अहवाल

नाल्यांवरील बांधकामांचा मागविला अहवाल

Published On: Aug 21 2019 1:35AM | Last Updated: Aug 20 2019 10:53PM
नाशिक : प्रतिनिधी

महापूर आणि मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक जुने वाडे आणि घरे कोसळल्याने हा चिंतेचा विषय झाला असून, भविष्यातील जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जुन्या वाडे व घरांची डागडुजी करण्यासाठी महापालिकेने संबंधितांना मंजुरी देण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. तसेच, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे निर्देश महापौरांनी मंगळवारी (दि. 20) झालेल्या महासभेत नगररचना विभागाला दिले आहेत. बहुतांश सदस्यांनी नैसर्गिक नाल्यांवरील बेकायदेशीर बांधकामांना प्रशासनास दोषी धरत चौकशीची मागणी केली. 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नाशिकला महापूर आला. या महापुरामुळे नदीकाठच्या आणि गावठाण भागातील पूररेषेत येणार्‍या बांधकामांची अपरिमित अशी हानी झाली. संततधार पावसामुळे जुने नाशिक भागातील जवळपास 15 वाडे कोसळले. यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच संबंधित मालकांना घर, वाडे दुरूस्तीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणीवजा प्रस्ताव काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी महासभेत सादर केला. त्यास सभागृहातील सर्वच नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी पाठींबा व्यक्‍त करत पूरग्रस्तांना मदत करण्यासह नैसर्गिक नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने झाली, असा प्रश्‍न उपस्थित करत अशा बांधकामांमुळे नाले बुजले असून, त्याचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच्या तक्रारी केल्या. प्रशासनाने पूररेषेचा बाऊ न करता तत्काळ घरमालकांना डागडूजीसाठी परवानगी देण्याची सूचना केली. 

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापुरामुळे केवळ झोपड्याच नाहीत तर पक्‍की घरे आणि बंगल्यांनाही तडा बसल्याचे सांगून महापुरात मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. आपत्कालीन घटनांची माहिती नगरसेवकांना मिळाल्यास त्यांना पुढे नागरिकांपर्यंत पोहचविता येऊ शकतात. यामुळे तशा प्रकारची व्यवस्था आगामी काळात व्हावी, अशी मागणी गजानन शेलार यांनी केली. गावठाणातील धोकादायक घरे व वाड्यांची दुरस्ती झाली पाहिजे. न्यायालयीन प्रकरणे असतील तर त्याविषयी महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून तशी परवानगी घेण्याची सूचना त्यांनी केली. पुराचा धोका निर्माण होऊ नये, म्हणून मनपाने नासर्डी नदीला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी चंद्रकांत खोडे यांनी केली. 

शहरातील नैसर्गिक नाल्यांवर बांधकामे झाल्याने नाले बुजले गेल्याची बाब शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली. गोदावरीसह उपनद्यांमधील छोटे बंधारे तसेच गाळमिश्रित माती काढून टाकल्यास पाण्याचा प्रवाह मोकळा होईल, अशी सूचना करत स्मार्ट सिटी कंपनीने ही कामे प्राधान्याने करणे अपेक्षित असताना कंपनीकडून इतरच कामे केली जात असल्याचा आरोप केला. 

अ‍ॅड. शाम बडोदे यांनी शिवकॉलनी परिसरातील नैसर्गिक नाल्यावर इमारती व दवाखान्याचे बांधकाम झाल्यामुळे पावसाचे पाणी कॉलनीतील सोसायट्यांमध्ये शिरत असल्याची तक्रार केली. शिवाजी गांगुर्डे व राहुल दिवे यांनी नासर्डी आणि गोदावरी नदीमधील छोट्या पुलांची उंची वाढविण्याची मागणी केली. भोसला मिलिटरी संस्थेच्या मोकळ्या परिसरात पावसाचे पाणी साचून ते सावरकरनगर, शंकरनगर व संतकबीर नगरमधील घरांमध्ये शिरत असल्याने त्याठिकाणी पावसाळी गटार योजना राबविण्याची सूचना संतोष गायकवाड यांनी केली.  चर्चेत दीक्षा लोंढे, अजिंक्य साने, सुनील गोडसे, संभाजी मोरूस्कर, वत्सला खैरे, समिना मेमन, अशोक मुर्तडक, वैशाली भोसले यांनी सहभाग घेतला. 

क्‍लस्टर डेव्हलपमेंटचा पाठपुरावा 

जुने नाशिक व पंचवटीतील गावठाण भागातील नागरी वस्त्यांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या क्‍लस्टर डेव्हलपमेंट योजनेचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याची सूचना महापौरांनी प्रशासनाला केली.

शहरातील नाल्यांची नावे 

शहर परिसरात एकूण 25 नाले आहेत. गंगापूरगाव, बारदान फाटा, चिखली व सोमेश्‍वर, आनंदवल्ली, सुयोजित उद्यानाजवळील, चव्हाण कॉलनीजवळील, चोपडा, जोशीवाडा, मल्हारखान, आसाराम बापू आश्रमाजवळील, सरस्वती, नागझरी, कन्नमवार पुलाजवळील, जाधव बंगल्याजवळील, अरूणा, वाघाडी, केवडीबन जवळील, मानूरगाव जवळील, पिंपळपट्टी, पवारवाडी, लेंडी नाला.