Tue, Jun 02, 2020 22:25होमपेज › Nashik › ‘सखी’द्वारे होणार अत्याचारग्रस्त महिलांचे पुनर्वसन

‘सखी’द्वारे होणार अत्याचारग्रस्त महिलांचे पुनर्वसन

Published On: Sep 04 2019 1:55AM | Last Updated: Sep 03 2019 11:19PM
नाशिक : नितीन रणशूर

खासगी व सार्वजनिक ठिकाणी महिला व बालिकांवर शारीरिक, लैंगिक, भौतिक, मानसिक आणि आर्थिक छळाच्या घटना सर्रास घडत असतात. महिला व बालिका अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच पीडितेचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र शासनाने ‘सखी’ वन स्टॉप योजना कार्यान्वित केली आहे. योजनेंतर्गत पीडितेेला एकाच छताखाली पाच सुविधा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. 

पीडित महिला व बालिकांना तातडीने मदत उपलब्ध झाल्यास त्यांचा आत्मविश्वास डगमगत नाही. मानसिक आधार मिळाल्यास पीडितेला नवी उभारी मिळते. त्या पार्श्वभूमीवर सन 2017 पासून संपूर्ण जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात सखी वन स्टॉप योजना सुरू करण्यात आली होती. आता ही योजना पूर्णवेळ कार्यान्वित होणार आहे. या योजनेंतर्गत पीडितेला वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत सहाय्य, समुपदेशन, कायदेशीर मदत, तात्पुरता निवारा (किमान पाच दिवस) आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  खासगी अथवा सार्वजनिक ठिकाणी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला व बालिकांच्या मानसिकतेचा विचार करून समुपदेशक, पोलीस, कायदेशीर सल्लागार व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने केंद्राकडून पीडितेला आवश्यक मदत पुरविली जाणार आहे. ‘सखी’मध्ये  प्राप्त झालेल्या तक्रारीतील पीडितेला न्याय मिळेपर्यंत विशेषत: तिचे पुनर्वसन होईपर्यंत तक्रार निकाली काढली जाणार आहे. त्यामुळे पीडितेला मोठा दिलासा मिळणार आहे. ‘सखी’ केंद्रावर महिला व बालविकास विभागाचे नियंत्रण राहणार आहे. महिला हेल्पलाइन नंबर 181 आणि इतर हेल्पलाइन नंबर ‘सखी’ केंद्रासोबत जोडण्यात आले आहेत. सखी केंद्राच्या माध्यमातून चोवीस तास सेवा पुरविली जाणार आहे. ‘सखी’च्या उभारणीसाठी केंद्र शासनाकडून निर्भया फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

राज्यातील पहिली इमारत नाशिकमध्ये

राज्यातली पहिली स्वमालकीची इमारत असलेले सखी केंद्र नाशिक-पुणे महामार्गावरील सामाजिक न्याय भवनच्या आवारात उभारण्यात आले आहे. 48 लाख 69 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या केंद्रासाठी 16 कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ उपलब्ध राहणार आहे. यामध्ये समुपदेशक, पोलीस अधिकारी, वकील, डॉक्टर-स्टाफ नर्स, काळजीवाहू, सुरक्षारक्षक आदींचा समावेश आहेे. सखी केंद्राचे लोकार्पण आठवडाभरात होणार आहे. 

असे असेल सखी केंद्र

सखी वन स्टॉप सेंटरची इमारत दोन मजली राहणार आहे. पहिल्या मजल्यावर कार्यालयीन प्रशासक, व्हिडिओ कॉन्फरन्स, समुपदेशक, वैद्यकीय सल्लागार यांच्यासाठी प्रत्येकी एक कक्ष तसेच दोन शौचालय राहणार आहेत. तर दुसर्‍या मजल्यावर निवार्‍याची व्यवस्था, शौचालये आणि स्वयंपाक रूम तयार करण्यात आले आहे.