Sun, Jan 19, 2020 15:31होमपेज › Nashik › बळीराजाने किती सोसायचे?

बळीराजाने किती सोसायचे?

Published On: Dec 02 2018 1:46AM | Last Updated: Dec 02 2018 12:09AMभागवत उदावंत
 

शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याला मिळणार्‍या मातीमोल भावामुळे शेतकरी कमालीचा हताश झाला आहे. शेतात रात्रंदिवस राबूनही घामाचे दामसुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे. उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारात मिळणारा भाव यामुळे शेती आतबट्ट्याचा व्यवहार बनला आहे. नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देणार्‍या बळीराजाने फक्‍त कष्टच करायचे का? त्याच्या श्रमाचे चीज होणार तरी कधी? असा प्रश्‍न बळीराजाला नेहमीच सतावतोय...

पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कुणाकडे मागावी, असाच काहीसा प्रश्‍न बळीराजापुढे उभा राहिला आहे. दोन आठवड्यांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्यामुळे शेतकरीवर्ग कमालीचा हतबल झाला आहे. ऊन, वारा, थंडी अशी कशाचीही तमा न बाळगता रात्रंदिवस शेतात राब राब राबूनही घामाचे मोल जर मिळत नसेल तर बळीराजाचा संताप होणे स्वाभाविक आहे. या संतापातूनच कुणी थेट पंतप्रधानांना कांदा विक्रीच्या पैशांची मनीऑर्डर करतो, तर कुणी विक्रीसाठी आणलेला कांदा थेट रस्त्यावरच ओतून देत आहे. कांद्याच्या लागवडीपासून तर विक्रीपर्यंत साधारणत: 70 ते 80 हजारांपर्यंतचा खर्च शेतकर्‍याला येत असतो. त्यामुळे किमान सातशे रुपये क्विंटल कांदा विकला गेला तरच काही प्रमाणात का होईना निदान खर्चाची गोळाबेरीज होते. नाही तर मेहनतीचे जाऊ द्या, उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चदेखील सध्या मिळणार्‍या भावातून वसूल होणे अवघड झाले आहे. देशात कांद्याचे प्रमाणापेक्षा जास्त झालेले उत्पादन आणि लाल कांद्याची वाढलेली आवक या सर्वांचा परिणाम भावावर झाला आहे. दीडशे रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळत आहे. तर बाजारात नव्याने दाखल होत असलेला लाल कांदा मात्र, एक हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. साठवलेल्या उन्हाळ कांद्याला भाव न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे इतर राज्यातील कांदा स्वस्तात उपलब्ध होत असल्याने त्याचा फटका जिल्हयातील शेतकर्‍यांना बसत आहे.  याशिवाय देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीतही कमालीची घट झाली आहे. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास वाढलेल्या आवकचा परिणाम भावावर होऊन कांदा मातीमोल विकला जात आहे.

देशात कांद्याचे सर्वत्र उत्पादन होत असले तरी त्यातही नाशिकचाच कांदा नेहमी भाव खाऊन जातो. कारण नाशिकच्या कांद्याची चव इतर राज्यातील कांद्याच्या चवीपेक्षा सरस आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कांदा लागवडीखालील आहे. येवला, चांदवड,, सिन्नर, निफाड, बागलाण, देवळा, मालेगाव या भागात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. इतर नगदी पिकांबरोबरच भाव चांगला मिळाल्यास कांदा शेतकर्‍यांना चांगले पैसे देऊन जातो. त्यामुळेच शेतकरीवर्गही इतर पिकांपेक्षा कांद्यालाच प्राधान्य देतात. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कांद्याच्या भावाने अचानक उसळी घेतली. 3,600 रुपयांपर्यंत कांदा विकला गेला होता. त्यामुळे कधी नव्हे शेतकर्‍याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण, नेहमीच शेतकर्‍यांना चांगलाच भाव मिळेलच असेही नाही. कारण आता हाच कांदा एक रुपया किलोने विकला जात आहे.

शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शाश्‍वत उत्पादन शेतकरी मिळवत असला तरी भावाची मात्र कोणतीच शाश्‍वती नसल्यामुळे शेतीव्यवसाय बिनभरवशाचा झाला आहे. जेव्हा शेतकर्‍याकडील कांदा संपुष्टात येतो नेमके त्याचवेळी कांद्याचा सेन्सेक्स उसळतो. गेल्या काही वर्षांपासूनचे हे गणित शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोसळवत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. शेतीतील अनिश्‍चित उत्पन्नामुळे शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत जातो. शासनाने कर्जमाफी दिली असली तरी त्याचा लाभ अजूनही शेतकर्‍याच्या हातात पडलेला नाही. लालफितीच्या कारभारामुळे कर्जमाफीचा फेरा अजूनही सुटलेला नाही. पिकांना हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा या मागण्यांसाठी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत शेतकर्‍यांनी धडक दिली. मात्र, अजूनही शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. नापिकी आणि शेतमालाला भाव मिळत नसल्याने हताश झालेला बळीराजा फास लावून घेत आहे. जिल्ह्यात एक वर्षात तब्बल 93 शेतकर्‍यांनी जीवन संपविले आहे. जेव्हा घरातील कर्ता पुरुषच जग सोडून जातो. तेव्हा संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. शासन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबाला एक लाखापर्यंतची मदत करते.

मात्र, शेतीसाठी घेतलेले कर्ज त्या शेतकर्‍याच्या पुढच्या पिढीलाच फेडावे लागते. कारण बँकांचा ससेमिरा सुरूच असतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो. मात्र, तोच आज अनेकाविध अडचणींनी त्रस्त आहे. शेतकर्‍याला केवळ अस्मानी संकटांनाच तोंड द्यावे लागते असेही नाही. सुल्तानी  संकटेदेखील शेतकर्‍यांच्या मुळावरच उठले आहेत. गेल्याच आठवड्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब विकण्यासाठी आलेल्या शेतकर्‍याच्या मापात ‘पाप’ करण्याचे काम व्यापार्‍याच्या कर्मचार्‍याने केले. एकतर पिकांना भाव कधी तरीच चांगला मिळतो. त्यात व्यापारी जर अशा पद्धतीने काटा मारायला लागले तर शेतकर्‍यांनी करायचे तरी काय? हा प्रश्‍न उरतोच. व्यापारी, मापारी हे संघटित असल्यामुळे पिकांना चांगला भाव मिळायला लागला की, व्यापारीवर्ग संघटितपणे भाव पाडण्याचे डाव रचतात. काही ना काही कारणे काढून संपाचे हत्यार उपसतात. शेतकर्‍याकडे मालाच्या विक्रीची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना व्यापार्‍यांचीच मर्जी झेलावी लागते. जिल्ह्यात यापूर्वीदेखील व्यापारी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष जेव्हा जेव्हा निर्माण झाला त्या प्रत्येकवेळी व्यापार्‍यांचीच सरशी झाली आहे. शेतकरीवर्ग संघटित नसल्यामुळे नेहमीच शेतकरी  संघर्षच करीत आला आहे. 

बाजारात मोठ्या प्रमाणात आलेल्या उन्हाळ कांद्याचा वांधा लाल कांद्याने केला आहे. कारण बहुतांश शेतकर्‍यांनी भविष्यात चांगला भाव मिळेल या आशेवर उन्हाळ कांदा साठवून ठेवला होता. मात्र, सध्या जो भाव मिळत आहे. त्यातून वाहतुकीचा खर्च देखील वसूल होणे अवघड झाले आहे.  याचदरम्यान लाल कांदादेखील बाजारात दाखल झाला.  महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतील कांदा व्यापार्‍यांना स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्यामुळे सर्वत्र कांद्याचे भाव गडगडले आहेत. शेतकर्‍यांना शाश्‍वत पैसे मिळवून देणार्‍या कांद्यामुळे नेहमीच शेतकर्‍यांचा वांधा होत आहे. जर उत्पादन खर्चही वसूल होत नसेल तर हा आतबट्ट्याचा व्यवहार करायचा तरी कशासाठी या निर्णयाप्रत शेतकरी आला आहे. त्यामुळे आता शासनानेच यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन होरपळणार्‍या शेतकर्‍याला मदतीचा हात देण्याची गरज आहे.