Tue, Nov 19, 2019 15:41होमपेज › Nashik › नाशिकरोडला विद्यार्थिनीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार

नाशिकरोडला विद्यार्थिनीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार

Published On: Apr 04 2019 1:59AM | Last Updated: Apr 04 2019 12:27AM
नाशिकरोड : वार्ताहर

पंचवटीत दोघा रिक्षाचालकांनी विवाहितेचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकरोड परिसरातही अशीच संतापजनक घटना घडली आहे. एका रिक्षाचालकाने अकरावीचा पेपर देऊन सायकलवर घरी जाणार्‍या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिची अर्धनग्न छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित रिक्षाचालकाविरोधात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल ऊर्फ सोनू माणिक शिंदे असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या आठवड्यात दि. 26 मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थिनी अकरावीचा पेपर देऊन सायकलवरून घरी जात होती. त्यावेळी रिक्षाचालक अनिल ऊर्फ सोनू शिंदे (एमएच 15 एफयू 1844) याने जेलरोड येथील पाण्याच्या टाकीपासून सैलानीबाबा चौकापर्यंत या विद्यार्थिनीचा पाठलाग केला. सैलानीबाबा चौकात या विद्यार्थिनीला रिक्षा आडवी लावून धमकावत बळजबरीने रिक्षात बसविले. तिला दसक स्मशानभूमीजवळील एकांतात नेऊन तिच्याशी अंगलट केली. यावेळी अनिलने तिला मारहाण करत तिचे कपडे काढायला लावून मोबाइलमध्ये अर्धनग्न छायाचित्रे काढली व ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.  

या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरलेली होती. तिने आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी तातडीने तपास करत अनिल शिंदे याला ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात अनिल विरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनीषा राऊत या करत आहेत.