Wed, Jun 03, 2020 07:30होमपेज › Nashik › भुजबळांचे पुनरागमन, की सेना गड राखणार?

भुजबळांचे पुनरागमन, की सेना गड राखणार?

Published On: Feb 21 2019 1:32AM | Last Updated: Feb 21 2019 1:32AM
ज्ञानेश्‍वर वाघ

नाशिक लोकसभा मतदारसंघात अलीकडच्या काळात एकाही उमेदवाराला दुसर्‍यांदा विजय मिळविता आलेला नाही. आता यावेळी या मतदारसंघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याविषयी उत्कंठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, यावर प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व समीर भुजबळ हे काका-पुतण्या आणि शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यात लढत झाली होती. त्यापैकी सन 2009ला समीर भुजबळ यांनी हेमंत गोडसे (तेव्हा मनसे) यांना पराभूत केले होते; तर सन 2014 च्या निवडणुकीत गोडसे (शिवसेना) यांनी त्याचा वचपा काढत छगन भुजबळ यांना हरविले होते. 

नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्‍चिम, देवळाली, सिन्नर व इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर हे 6 विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. गेल्या तीन निवडणुकांचा इतिहास पाहिला तर 2004 व 2009 या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीने हा मतदारसंघ राखला होता. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे देवीदास पिंगळे यांनी 3 लाख 7 हजार 612 मते मिळवून शिवसेनेचे उमेदवार तथा माजी महापौर दशरथ पाटील आणि भाकप उमेदवार राधेश्याम गुंजाळ यांचा पराभव केला होता. अवघ्या 15 हजार मतांनी पाटील यांना हा पराभव पत्करावा लागला होता. अर्थात, त्यावेळी शिवसेनेतील बंडाळीचा आणि महापालिकेतील नाराज कर्मचार्‍यांचा पाटील यांना फटका बसला होता. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसनेच निवडणुकीचे रणांगण काबीज केले होते. फक्त यावेळी उमेदवार समीर भुजबळ होते. त्यांना 2 लाख 38 हजार 706 मते मिळाली होती. तर तेव्हाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार व सध्याचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना 2 लाख 16 हजार 674 मते मिळाली होती. 22 हजार 32 मतांनी गोडसे यांचा विजय हुकला होता. शिवसेनेचे उमेदवार तथा माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना तिसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले होते. 2009 मध्ये विजयाच्या जवळपास पोहोचलेल्या हेमंत गोडसे यांनी 2014 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेकडून उमेदवारी करीत थेट माजी मंत्री छगन भुजबळ यांना धोबीपछाड देत इतिहास घडविला होता. गोडसे यांना तब्बल 4 लाख 94 हजार 735 मते, तर भुजबळ यांना 3 लाख 7 हजार 399 मते मिळाली होती. 

मागील निवडणुकीच्या वेळी छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदनातील बांधकाम घोटाळ्यासह अनेक घोटाळ्यांच्या आरोपांचे ग्रहण लागले होते. शिवाय नाशिकमधील गुंडगिरी आणि वाहने जाळण्याचे सत्र याच काळात मोठ्या प्रमाणावर फोफावले होते. त्याच्याशी भुजबळ यांचे नाव जोडले गेल्याने नाशिककरांनी भुजबळांवरील आपला राग मतदानातून व्यक्त केला होता. या काही कारणांची भुजबळ यांच्या पराभवाला किनार होती. या मतदारसंघात कोणा एका पक्षाचे प्राबल्य राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जवळपास समान पातळीवर आहेत. शिवसेना-भाजपची युती झाल्याने शिवसेनेचा उमेदवार असेल, हे नक्की. सध्या समीर भुजबळ यांचे नाव पुढे आहे. परंतु, ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलून छगन भुजबळ यांच्या नावाचा कार्यकर्त्यांकडून आग्रह होऊ शकतो. 

मतदारसंघासमोरील आव्हाने 

मतदारसंघात समृद्धी महामार्ग प्रकरणाची समस्या आ वासून उभी आहे. या महामार्गाला इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. सध्या या विरोधाची धार बोथट झाली असली, तरी हा विरोध निवडणुकीत कितपत युतीसमोर उभा असेल आणि आघाडीला त्याचा किती फायदा मिळेल, हा यक्षप्रश्‍न आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी शेतकर्‍यांसाठी हवा तेवढा लढा दिलेला नाही. त्यामुळे आघाडीलाही त्याचा फायदा होईल, असे दिसत नाही. इगतपुरी हा धरणांचा तालुका म्हणून ओेळखला जातो. तरी त्याच्यासह सिन्नर तालुका नेहमीच दुष्काळी राहिला आहे. उशाशी अनेक धरणे असूनही येथील जनतेला अद्याप मुबलक पाणी मिळू न शकल्याने मतदारांचे घसे कोरडेच आहेत. 

लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी नाशिक पूर्व, पश्‍चिम व मध्य हे विधानसभा  मतदारसंघ भाजपकडे आहेत. देवळाली व सिन्नर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे, तर इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघात तूर्तास शिवसेना-भाजप युतीचेच प्राबल्य आहे. परंतु, गेल्या पाच वर्षांची कामगिरी पाहता मतदार युतीला तारणार की आघाडीच्या उमेदवाराला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

सन 2014 ची स्थिती

हेमंत गोडसे  ( शिवसेना )                     4,94,735
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)          3,07,399