Fri, May 29, 2020 08:59होमपेज › Nashik › नाशिक शहर-परिसरात पावसाचा जोर वाढला

नाशिक शहर-परिसरात पावसाचा जोर वाढला

Published On: Aug 09 2019 2:08PM | Last Updated: Aug 09 2019 1:38PM

संग्रहित छायाचित्रनाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहर व परिसरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच असल्याने अनेक मंदिरे अद्यापही पाण्याखाली आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातही पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यात पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

जिल्ह्यातील पावसाने मुक्काम ठोकला असला, तरी दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र, नाशिक शहरात गुरूवारी (दि. ८) मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरवात केली. परिणामी नाशिककरांची सुरुवात सकाळ पावसाच्या आगमनासह झाली. दरम्यान, गंगापूर धरणातून ५४०१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने गोदाकाठावरील अनेक छोटे-मोठे पुल पाण्याखाली आहेत. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारूतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे. परिणामी गोदाकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे गोदावरीच्या पुरानंतर सराफ बाजार,दही पूल भागातील गाळ उपसण्याचे काम सलग पाचव्या दिवशीही सुरू होते.

ग्रामीण भागात पावसाने उघडीप घेतलेली नाही. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदी तालूक्यांमध्ये संततधार कायम असल्याने तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या गत २४ तासांमध्ये एकुण ३३२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये ६८ तर इगतपुरीत ६१ मिमी पाऊस झाला.