Wed, Jun 03, 2020 22:39होमपेज › Nashik › डायग्नोस्टिक सेंटर्सवर नाशिकमध्ये छापे

डायग्नोस्टिक सेंटर्सवर नाशिकमध्ये छापे

Published On: Feb 21 2019 1:30AM | Last Updated: Feb 21 2019 12:50AM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिकसह धुळे आणि जळगावमधील नामांकित डायग्नोस्टिक सेंटरसह काही रुग्णालयांवर आयकर विभागाने एकाच वेळी छापे मारल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि.20) सकाळी 8.30 वाजेपासून दिवसभर हे छापासत्र सुरूच होते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असली तरी छाप्यांमध्ये काही गैरप्रकार आढळले का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

बुधवारी सकाळी 8.30 वाजता शहरातील पाच ते सहा डायग्नोस्टिक सेंटरवर आयकर विभागाने एकाच वेळी छापा मारला. त्यात गंगापूर रोडवरील लोटस् डायग्नोस्टिक, सीबीएस कॉर्नर येथील विंचूरकर डायग्नोस्टिक, महात्मानगर येथील मेट्रो पोलीस डायग्नोस्टिक यांच्यासह बिटको सर्कल, निमाणी परिसर आणि खुटवडनगर येथील डायग्नोस्टिक सेंटरचा समावेश आहे. यावेळी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी सेंटरमधील संगणक आणि कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते. तसेच, काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, छापा टाकताना आयकर विभागाने पोलीस बंदोबस्तही घेतला होता. त्यामुळे ज्या ठिकाणी छापे पडले तेथे प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक डायग्नोस्टिक सेंटरचे दैनंदिन एमआरआय, सिटी स्कॅन आदी कामकाज सुरु असल्याने आयकर विभागाचा छापा पडल्याची शंका रुग्णांना येत नव्हती. मात्र दुपारनंतर छापा पडल्याचे चित्र स्पष्ट झाले. छाप्यादरम्यान आयकर विभागाचे कोणते पथक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, मुंबईनाका परिसरातील दोन मोठ्या रुग्णालयांवरही आयकर विभागाने छापे टाकल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात होती. आयकर विभागाने नाशिकसह धुळे आणि जळगावमध्येही कारवाई केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. मार्च अखेरपर्यंत हे छापासत्र सुरु राहणार असून, आक्षेपार्ह व्यवहार आयकर विभागाकडून तपासले जात आहे. संशय आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

छाप्याबाबत गुप्तता 

आयकर विभागाने हे छापे टाकताना अतिशय गुप्तता पाळली होती. पोलिसांकडून गोपनीय बंदोबस्त घेतल्यानंतर 20 ते 30 सशस्त्र पोलिसांना बुधवारी (दि.20) पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयात बोलावले. तेथून स्वतंत्र बसने पोलिसांना त्र्यंबकेश्‍वर येथे नेले. वाहनांमधून छापे टाकण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांनाही छापा पडल्यानंतरच हे आयकर विभागाचे पथक असल्याचे समजले.