Sat, Jul 11, 2020 20:37होमपेज › Nashik › प्रस्तावित पुलांना विरोध

प्रस्तावित पुलांना विरोध

Published On: Aug 26 2019 1:48AM | Last Updated: Aug 26 2019 1:48AM
नाशिक : प्रतिनिधी

शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीवर दोन नवीन पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. भविष्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज बांधता या प्रस्तावित पुलांना नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून, यासंदर्भात आ. देवयानी फरांदे यांनी शहरात चर्चासत्राचे आयोजन केले होते. 

महापालिकेतर्फे गोदावरी नदीवर जुने पंपिंग स्टेशन ते मखमलाबाद या दरम्यान एक पूल होणार असून, दुसरा पूल आसाराम बापू पुलाजवळीलच आभाळे मळा ते शिंदे मळा या दरम्यान होणार आहे. या प्रस्तावित पुलांमुळे पुराचा प्रभाव वाढेल. यासंदर्भात नागरिकांना जागरुक करत त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी संवादात्मक चर्चासत्र बोलविले होते. फरांदे यांनी 2008, 16 आणि नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे नाशिककरांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगितले. महापालिकेने बांधलेले पूल गोदावरी आणि नासर्डीच्या पुरात पाण्याखाली जात असल्याने संबंधित पूल पाडून त्या जागी महत्तम पूररेषेच्यावर नवीन पूल बांधण्याची आवश्यकता आहे. तसेच, नदीपात्रात अडथळा ठरणारी बांधकामे आणि बंधारे हटविण्याचा अहवालही केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेने नाशिक मनपाला दिला आहे. अशा परिस्थितीत मनपाच्या दोन नवीन पुलांमुळे पुराचा प्रभाव वाढणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले. 

आ. फरांदे यांनी पॉवर पॉइंट प्रझेन्टेशनच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण करणार्‍या बांधकामात या दोन नवीन पुलांची भर पडून पुराचा प्रभाव कसा वाढेल, त्यामुळे कसे संकट ओढावेल, याची सविस्तर माहिती दिली. तसेच, या पुलांच्या उभारणीसाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रदेखील मनपाने घेतले नसल्याचे फरांदे यांनी निदर्शनास आणून दिले. 

या प्रसंगी शहरातील सुयोजितनगर, आयाचितनगर, साई सोसायटी, कमलकुंज सोसायटी, मधुकमल सोसायटी, चैतन्यनगर परिसरातील नागरिकांनी महापुरावेळीचे अनुभव कथन करताना नवीन पुलांना विरोध दर्शविला. दरम्यान, या चर्चासत्रानंतर आ. फरांदे यांनी नागरिकांसमवेत प्रस्तावित पुलांच्या ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली.