Wed, Jun 03, 2020 07:26होमपेज › Nashik › ‘त्या’ व्हिडिओच्या निमित्ताने... 

‘त्या’ व्हिडिओच्या निमित्ताने... 

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:32AMरवाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या काही आठवणी, काही पोस्ट्स - काही सुखद, काही हसवणार्‍या, काही गुदगुल्या करणार्‍या आणि व्हायरल म्हणवला गेलेला प्रिया प्रकाशचा व्हिडिओ...

प्रिया प्रकाश...  पोरगी मोठी गोड आहे. भुवयांचे आणि डोळ्यांचे विभ्रमही मस्तच केलेत तिने! आणि तो मुलगा - रोशन अब्दुल रौफ - तो पण काय क्यूट एक्स्प्रेशन्स देतोय... दिवसभर व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारे व्हिडिओज, टीव्ही चॅनेल्सवर दाखविलेल्या प्रियाच्या मुलाखती... 

‘व्हॅलेन्टाइन डे’ खराखुरा रंगतदार झाला. सगळा देश या शृंगाररसात बुचकळून निघाला.  पूरे देश के सामने केवल एक ही काम बचा था - प्रिया प्रकाश की अदाएं देखते रहना! - पण कुठल्याही कलाकृतीला डॉक्टरी मापदंड लावण्याची आपली सवय जरा वाईटच!

- म्हणजे असं की उगीच मनात येतं, या सगळ्या विभ्रमांची परिणती कशात होणार? प्रेमात? पळून जाण्यात? लग्नात? शिक्षण सोडून संसाराचा गाडा ओढत राहण्यात? लव्ह जिहादमध्ये? सैराटमध्ये? की ज्या कोणी पोरी बेसावध असतील त्यांच्या प्रेग्नन्सी घेऊन डॉक्टरकडे पोहोचण्यात? आई-बापांच्या परेशानीत? बॉयफ्रेंडच्या तोंड लपवण्यात?  पोरीला एकटीला त्रास सहन करायला लागण्यात?

- आणि काही कॉम्प्लिकेशन्स झालेच तर अतोनात रक्‍तस्त्राव, अ‍ॅनिमिया, भविष्यात कायमचा जंतुसंसर्ग, गर्भधारणा न होणे वगैरे-वगैरेंत? हे डॉक्टरी मन वाईटच! इतक्या रोमँटिक गोष्टीवरून हे कुठे अ‍ॅनिमियावर येऊन धडपडलं! पुन्हा समाजाला काही सकारात्मक विचार देते ती खरी कलाकृती, हेही वाचल्याचं आठवलं. मग विचार आला, की काय संदेश देतोय हा व्हिडिओ सर्वांना?

- प्रेमात पडा..! तेही 13-14 च्या वयात! - आधीच वयात येण्याचं वय कमी झालंय. मागे  ‘एक दुजे के लिए’ सिनेमा पाहून अनेक प्रेमी जोड्यांनी हातात हात घालून आत्महत्या केल्या होत्या. असा तर आपल्या समाजाचा बुद्ध्यांक!

- आता हा व्हिडिओ पाहून शाळा-शाळांत असे विभ्रम सुरू झाले तर नवल नको वाटायला. हो, पण भिन्नलिंगी आकर्षण ही तर एक नैसर्गिक गोष्ट. त्याला विरोध, म्हणजे आपण प्रतिगामी झालोत की काय? नाही - विरोध त्याला नाही...

- विरोध ना कळत्या वयाला आहे, विरोध कोवळ्या शरीराला आहे, विरोध नाजूक हातांना आहे, विरोध दुबळ्या खांद्यांना आहे, विरोध कमजोर पंखांना आहे, विरोध मीडियाच्या अशा मनोवृत्तीला आहे, जिला समाजाला आपण कोणती दिशा दाखवतो आहोत, याचं भान उरलेलं नाहीए... विरोध दांभिक व्यापारी प्रवृत्तीला आहे, जी गल्ला भरण्यासाठी कशाचाही बळी द्यायला तयार आहे...  

- डॉ. मेधा मलोसे