Tue, Nov 19, 2019 12:48होमपेज › Nashik › जळगाव कारागृहात एकाच कैद्याचा चार दिवसात दोघांवर प्राणघातक हल्ला

जळगाव कारागृहात एकाच कैद्याचा चार दिवसात दोघांवर प्राणघातक हल्ला

Published On: Sep 06 2019 5:03PM | Last Updated: Sep 06 2019 4:52PM

file photoजळगाव : प्रतिनिधी 

जळगाव येथील जिल्हा कारागृहात आज (ता.६) सकाळी एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला धारदार पत्रा मारून जखमी केल्याची घटना घडली. याच कैद्याने मंगळवारी (ता.३) उप तुरुंग अधिकाऱ्यावर लोखंडाची पट्टी मारून जखमी केले होते. चार दिवसात एका कैद्याने दोघांना जखमी केल्याच्या घटना घडल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर कारागृहांचे डीआयजी येथील कारागृहाला भेट देणार असल्याचे समजते. आजच्या घटनेनंतर अन्य कैद्यांच्या नातलगांना त्यांची भेट घेण्याची मनाई करण्यात आली होती.

अधिक माहिती अशी की, घरात घुसून शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सचिन दशरथ सैंदाणे (वय ३०) हा गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने गेल्या सोमवारी सायंकाळी सहकैदी महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील याच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याने नकार दिल्याने दोघांमध्ये मंगळवारी सकाळी वाद झाला. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेले उप तुरुंग अधिकारी किरण पवार यांना सचिनने लोखंडी पट्टी मारून जखमी केले होते.

या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असतानाच आज सकाळी ६.३० च्या सुमारास सचिन सैंदाणेने दुसरा सहकैदी शुभम देशमुख हा ब्रश करीत असताना त्याच्या पाठीवर पत्र्यासारख्या वस्तूने वार करून त्याला जखमी केले. जखमी शुभमवर कारागृहातच उपचार करण्यात आले असून या प्रकरणी लवकरच अहवाल पाठविला जाणार असल्याचे तुरुंग अधीक्षक अनिल वांढेकर यांनी सांगितले.