Tue, Jul 07, 2020 17:16होमपेज › Nashik › पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा?

Published On: Mar 23 2019 1:15AM | Last Updated: Mar 23 2019 1:15AM
नाशिक : प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढील महिन्यात नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्याची तयारी स्थानिक पदाधिकार्‍यांनी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून कसा वेळ मिळतो, त्यानुसार सभेची तारीख अंतिम केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे.  

लोकसभा निवडणुकीचे रणांगण सुरू झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांपैकी नाशिक व दिंडोरीसह धुळे, नंदुरबार व शिर्डीमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर जळगाव, नगर व रावेर येथे 23 एप्रिलला मतदान होत आहे. या आठही मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांनी नाशिकमध्ये सभा घ्यावी यासाठी युतीच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला जात आहे. तेथून ग्रीन सिग्नल मिळाल्यास पंचवटीमधील साधुग्रामच्या मैदानात या सभेचे नियोजन केले जात आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होती. त्यावेळी मोदी लाटेमुळे उत्तर महाराष्ट्रात सर्व मतदारसंघांवर युतीने एकहाती विजय संपादित केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकांवेळी दोन्ही पक्ष हे स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमधील भाजपाच्या उमेदवारांसाठी साधुग्राममधील मैदानावर सभा घेतली होती. त्या सभेनंतर भाजपाला चांगला फायदा झाल्याने पुन्हा एकदा त्याच मैदानावर मोदी यांना पाचारण करण्याची तयारी केली जात आहे. मोदी यांची सभा होणार की नाही हे अद्याप निश्‍चित नसले तरी सभेच्या दृष्टीने युतीच्या नेत्यांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजनावर भर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मोदी यांची नाशिकमध्ये सभा झाली तरी ते 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील इतिहास पुन्हा रचणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पवार-ठाकरे एकाच व्यासपीठावर?

मनसेने लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली आहे. यंदाच्या निवडणुकीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनाच विरोध करा, असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. हाच धागा पकडून राष्ट्रवादीने नाशिकमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरे यांची संयुक्त प्रचारसभा घेण्याची तयारी सुरू केल्याचे समजते आहे. तसे झाल्यास 2014 मध्ये भुजबळ काका-पुतण्यांविरोधात प्रचार करणारे ठाकरे हे यंदा समीर भुजबळ यांच्यासाठी मतांचा जोगावा मागताना पाहायला मिळतील.