Wed, Jun 03, 2020 21:11होमपेज › Nashik › राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान 

राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान 

Published On: Sep 09 2019 1:33AM | Last Updated: Sep 08 2019 11:10PM
नाशिक : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याची वेळ आली आहे, यास केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा आडमुठेपणा व विश्वासघातकी डावपेचच कारणीभूत असल्याचे स्पष्ट मत माजी आमदार तथा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी व्यक्त केले आहे. दुर्देवाने हर्षवर्धन पाटील यांना राज्यस्तरीय नेतृत्व न्याय देऊ शकलेे नाहीत, याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळीही नगरची जागा सुजय विखे-पाटील यांना सोडली असती तर कदाचित राज्याच्या राजकारणात वेगळे चित्र दिसले असते. मात्र, त्याहीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत आडमुठे धोरण स्वीकारले व त्याचेच दुष्परिणाम आता काँग्रेस व राष्ट्रवादीला भोगावे लागत आहेत. आज, दुर्देवाने काँग्रेस पक्षातील गळती थांबविण्यासाठी समर्थ नेतृत्व राज्यस्तरावर पक्षाकडे नाही. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख असते तर त्यांनी राधाकृष्ण विखे व हर्षवर्धन पाटील व पक्षातील अन्य नेत्यांवर अन्याय होऊ दिला नसता व त्यांच्यावर पक्ष सोडायची पाळी आली नसती. काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था, पडझड त्यांनी होऊ दिली नसती, असेही छाजेड यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या या अवस्थेमुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतता निर्माण झाली आहे. ही वेळ एकजुटीने आव्हान पेलण्याची असताना दोनही पक्षात सुसूत्रता नसल्याने दोनही पक्षांचे भविष्य विधानसभा निवडणुकीसाठी खडतर असल्याची ही चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी त्यांच्या सोयीचे व गांधी घराण्याच्या द्वेषाचे राजकारण केले असल्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या मुशीत तयार झालेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यातील निष्ठावान कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन या आव्हानाला सामोरे जाण्याचे आवाहन छाजेड यांनी केले आहे.