Tue, Nov 19, 2019 15:27होमपेज › Nashik › प्रलंबित मागण्यांसाठी टपाल कर्मचारी आक्रमक

प्रलंबित मागण्यांसाठी टपाल कर्मचारी आक्रमक

Last Updated: Oct 15 2019 12:04AM
नाशिक : प्रतिनिधी

प्रलंबित मागण्यांसाठी पोस्ट कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले असून, मंगळवारी (दि.15) पोस्टाचे कर्मचारी एक दिवस कामाच्या वेळेत उपोषण करणार असून, शुक्रवारी (दि.18) विभागीय कार्यालयासमोर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत धरणे व निदर्शने करणार आहेत.  

1 जानेवारी 1996 च्या फरकाची निवृत्त कर्मचारी व पदोन्नती मिळालेले पोस्टल असिस्टंट यांना थकबाकी द्यावी. पोस्टमन, एमटीएस, मेलगार्ड व जीडीएसच्या थेट भरतीमार्फत सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात. यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मागण्या मान्य न झाल्यास 21 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र व गोवा राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. 

आंदोलनात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन-पोस्टमन अ‍ॅण्ड एमटीएस, नॅशनल, युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज युनियन-पोस्टमन अ‍ॅण्ड एमटीएस, ऑल इंडिया मेल मोटार सर्व्हिस मेलगार्ड अ‍ॅण्ड एमटीएस, नॅशनल युनियन मेल मोटार सर्व्हिस मेलगार्ड अ‍ॅण्ड एमटीएस, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज ग्रामीण डाकसेवक, ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आदी संघटना सहभागी होणार आहे. सर्वच संघटनांची  शाखा स्तरावर संयुक्त कृती समितीची स्थापना करून डिव्हिजन हेड यांना नोटीस बजाविण्यात आल्याचे अध्यक्ष ब्रह्मदेव शेवाळे, पोपट देसाई, कृष्णा गायकवाड, योगेश घोडे, सुभाष दराडे, जितू शिंदे, सुनील जगताप, शकील सय्यद आदींनी स्पष्ट केले आहे.

प्रलंबित मागण्या अशा...

पोस्टमन, एमटीएस प्रवर्गातील रिक्त जागा भरा, ई-कॉमर्स पार्सलची नोडल वितरण पद्धत बंद करा, आरएमएस विभागातील सेक्शन एल-35 त्वरित चालू करावे, सर्कल प्रशासनाने वाटाघाटींमध्ये आश्‍वासनांची पूर्तता करावी, खातेबाह्य रोजदारी कामगारांना मुख्य लेबर कमिशनरच्या सुधारित दराप्रमाणे वेतन द्यावे, जीएस कामगारांना रविवार व सुटीच्या दिवसाचा पगार देण्यात यावा, आऊटसोर्सिंग पोस्टल एजंट पद्धत तत्काळ बंद करावी.