Tue, Jun 02, 2020 14:26होमपेज › Nashik › ...जेव्हा शिवसैनिक गातात भुजबळांचे गोडवे

...जेव्हा शिवसैनिक गातात भुजबळांचे गोडवे

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 31 2018 2:02AMनाशिक : कुंदन राजपूत

जिल्ह्याच्या विकासात आजपर्यंत सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सुटका व्हावी यासाठी जिल्हाभर मेळावे सुरु असून त्यात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर काँग्रेस, शिवसेना आणि सत्तारुढ भाजपाच्याही नेत्यांचा सहभाग असल्याने या सर्वपक्षीय भुजबळप्रेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यातही काल भुजबळांना गद्दार म्हणणार्‍या शिवसेनेकडूनही भुजबळांची भलावण सुरु असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

मनी लॉण्ड्रिंग व महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेने मुखपत्रातून फटाके फोडले होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न करणार्‍या भुजबळांवर काळाने सूड उगवला, या ठाकरे शैलीत सेनेने भुजबळांचा समाचार घेतला होता. मात्र, दोन वर्षांनंतर सेना नेतृत्वाला उपरती झाली आहे. सेना नेते संजय राऊत हे भुजबळांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आहे. तर, जिल्ह्यातील शिवसैनिक ‘अन्याय पे चर्चा’ बैठकीला हजेरी लावत भुजबळांचे गोडवे गात असल्याचे अचंबित करणारे दृश्य पाहायला मिळत आहे.
भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप करत त्यांचे समर्थक एकवटले आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते भुजबळांसाठी ‘अन्याय पे चर्चा’ यात सहभाग घेत आहेत. त्यात शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम, दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले, जि. प. अध्यक्षांचे पती उदय सांगळे हे अग्रस्थानी आहेत. तसेच भुजबळ यांच्या सुटकेसाठी तालुकानिहाय झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी हिरिरीने सहभाग नोंदवला आहे. शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुजबळ मूळचे शिवसैनिक. मात्र, मंडल आयोगाच्या वादावरून त्यांनी 16 वर्षांपूर्वी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यावेळी शिवसैनिकांनी भुजबळांना जेरीस आणले होते. तसेच भुजबळांनीही उपमुख्यमंत्री व गृहमंत्री झाल्यावर शिवसेनाप्रमुखांना एका जुन्या खटल्यात अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भुजबळांबद्दल शिवसैनिकांच्या मनात राग आहे. भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्या अटकेनंतर सेना नेतृत्वाने ‘भुजबळांवर काळाने सूड उगवला’ या शब्दात आनंदोत्सव साजरा केला होता. ‘सेनेत असताना भुजबळांनी आंदोलने केली. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. मात्र, भुजबळ हे हीरो झाले होते. आज ते तुरुंगात असून, भ्रष्टाचारामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली,’ या शब्दात सेनेने डरकाळ्या फोडल्या होत्या. मात्र, दोन वर्षांनंतर सेनेच्या भूमिकेत बदल झाला असून, भुजबळांवर अन्याय होत असल्याचा साक्षात्कार सेनेला झाला आहे. सेना नेते संजय राऊत असो की जिल्ह्यातील पक्षाचे लोकप्रतिनिधी असो, भुजबळांबद्दल त्यांचे प्रेम वारंवार उफाळून येत आहे. 

सेनेच्या या यूटर्न भूमिकेने जुने जाणकार स्वकियसुद्धा अचंबित आहेत. ज्यांनी ठाकरे यांच्या अटकेसाठी प्रयत्न केला त्यांच्याबद्दल आजी -माजी शिवसैनिकांना प्रेमाचा पाझर फुटला आहे, त्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.