Tue, Jun 02, 2020 13:00होमपेज › Nashik › गांधींबद्दल द्वेष पसरविणे ही राजकीय चाल!

गांधींबद्दल द्वेष पसरविणे ही राजकीय चाल!

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:06AMसुदीप गुजराथी

जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखविणार्‍या महात्मा गांधींची आज (दि.30) 70 वी पुण्यतिथी. यानिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही गैरसमजांविषयी ज्येष्ठ अभ्यासक, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्याशी साधलेला हा संवाद...

स फाळणी, पाकिस्तानला 55 कोटी रुपये देणे वगैरे प्रकरणांवरून आजही गांधीजींवर अश्‍लाघ्य टीका केली जाते. वस्तुत: या प्रकरणांना गांधीजी जबाबदार नव्हते, हेही टीकाकारांना माहीत असते तरी गांधींबाबत एवढा पराकोटीचा द्वेष का पसरविला जातो?

- देशाच्या फाळणीला गांधीजींचा तीव्र विरोध होता. शेवटपर्यंत त्यांनी फाळणीला मान्यता दिली नव्हती. पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा करार गांधींनी केला नव्हता, तर तो सर्वसंमतीने झाला होता. आपण आपला शब्द पाळावा व कराराप्रमाणे पैसे द्यावेत, एवढेच गांधीजींचे म्हणणे होते. पाकिस्तानला पैसे द्यावेत, यासाठी त्यांनी उपोषण केल्याचा गैरप्रचार केला जातो. गांधीजींच्या त्या उपोषणाला अन्य प्रमुख कारणे वेगळी होती तरीही या प्रकरणांवरून गांधीजींबद्दल द्वेष पसरविण्यामागे विशिष्ट धोरण वा राजकीय चाल आहे. गांधीजींनी आजन्म हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला. मात्र, हे ऐक्य नको असणार्‍यांकडून गांधींबद्दल अपप्रचार केला जातो.  गांधींनी स्वत:च्या मुलासह सरदार पटेल, सुभाषबाबूंवर अन्याय केला, या आक्षेपात कितपत तथ्य आहे?

- हे सगळे गैरसमज आहेत. गांधीजींचा एकत्र कुटुंबपद्धतीवर विश्‍वास होता. आश्रमात सर्वांनी एकसमान राहावे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या मुलाला कधीच वेगळी वागणूक दिली नाही. त्यांनी तसे केले असते, तर ते या आक्षेपापेक्षा अधिक गंभीर ठरले असते. त्यांच्या मुलाला त्यांचे सगळे विचार पटतील, असे गृहित धरणे जसे चुकीचे आहे, तसे महात्म्याच्या मुलाने महात्माच व्हावे, ही अपेक्षाही गैर आहे. या दोघांना वडील व मुलगा अशा दोन्ही दृष्टिकोनांतून समजून घेतल्यास कोणाचाच अनादर होणार नाही. पटेल व नेहरू यांच्यात पंतप्रधानपदासाठी नेहरूंची निवड करण्याचा त्यांचा निर्णयही पटेल यांचे वय पाहता योग्यच होता. गांधीजींना देशाचा स्वातंत्र्यलढा अहिंसक मार्गानेच पुढे न्यायचा होता. त्यामुळे त्यांचे सुभाषबाबूंशी मतभेद होते; मात्र दोघांनाही एकमेकांविषयी अतीव आदर होता. पटेल, सुभाषबाबू वा भगतसिंग यांच्या देशभक्‍तीविषयी गांधीजींना अजिबात शंका नव्हती. उलट त्यांनी त्यांचा नेहमी गौरवच केला होता.

स गांधीजींनी अनेकदा आपली भूमिका बदलली. ते आपल्या मतांवर कधीच ठाम राहिले नाहीत. असे का?

- गांधींवरील अनेक आक्षेपांपैकी हा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. खरे तर गांधीजी हे गैरसमजांच्या भोवर्‍यात अडकलेले व्यक्‍तिमत्त्व आहे. त्यांंच्यावरील अनेक आक्षेप वरवरचे आहेत. त्यांच्या बदलत्या निर्णयांची संगती ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मचरित्रातून लावता येते. कोणत्याही निर्णयाला तो काळ, परिस्थिती, धोरण यांचा संदर्भ असतो. एकीकडे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी अहिंसक लढा देताना आणि दुसरीकडे देशांतर्गत प्रश्‍न सोडवताना दोन पावले मागे येण्याची वेळ आली, तेव्हा गांधीजींनी निर्णय बदलले. त्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या मूल्यांचे पुनरुज्जीवन केले, त्यामागे स्वातंत्र्य मिळवणे हा उद्देश होताच; पण मिळालेले स्वातंत्र्य चिरकाल टिकावे, देश अखंड राहावा याची पायाभरणीही त्यांना करायची होती. या दुसर्‍या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी या महात्म्याने वेळ आल्यावर निर्णय बदलले. निर्णयांना चिकटून राहिल्यास त्यातून भविष्यात देशाची हानी होऊ शकते, याची त्यांना जाणीव होती. त्यांनी निर्णय बदलले; मात्र आपल्या मूळ भूमिकेवर ते नेहमी ठाम राहिले. 

स गांधीविचारांमध्ये संगणक वगैरे आधुनिक यंत्रणांना स्थान नव्हते, असे दावे केले जातात. ते किती खरे आहे? गांधीजी एवढ्या बंदिस्त विचारांचे होते का?

- गांधीजी नेहमी जनसमूहाचा विचार करीत असत. माणसाच्या मूलभूत गरजा भागवण्याला त्यांचे प्राधान्य असे. एक प्रसंग सांगतो. शांतिनिकेतन येथे गांधीजी मुक्‍कामी होते. सकाळी फिरायला जाताना रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना विचारले, ‘तुम्हाला झाडांवरच्या या पक्ष्यांचे कूजन भावते का?’ त्यावर गांधी उत्तरले, ‘हे कूजन कर्णमधुरच आहे; पण ते करणार्‍या पक्ष्यांच्या चोचीत दाणा जातो की नाही, हे पाहणे मला अधिक महत्त्वाचे वाटते.’ याच विचारातून तेव्हा गांधीजींनी लोकांच्या मूलभूत गरजा भागविण्यावर भर दिला. त्यांचा विकासाला नव्हे, तर भांडवलशाहीला विरोध होता. ते कार, रेल्वेने प्रवास करीत, फोनवर बोलत. सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण करतानाचा त्यांचा फोटो प्रसिद्ध आहे. ते सरसकट यंत्रविरोधक नव्हते. माणसांना स्वावलंबी करणार्‍या यंत्रांना त्यांनी कधीच विरोध केला नाही. फक्‍त यंत्रे ही वंचितांच्या शोषणाची माध्यमे बनू नयेत, असे त्यांचे म्हणणे होते. महत्त्वाचे म्हणजे, गांधीजी नित्य नवा विचार करीत, बदलांचे स्वागत करीत. एकाच विषयांवरील माझी दोन वेगवेगळी मते असतील, तर त्यांपैकी जे सर्वांत नवे मत असेल ते विचारात घ्यावे, असे ते म्हणत. त्यामुळे संगणक असो वा अन्य बाबी, गांधीजींनी त्यांची भूमिका लवचिक ठेवली असती, असे मला वाटते. 

गांधीजींचे विचार कालबाह्य झाल्याचे बोलले जाते. त्यात तथ्य आहे का? गांधीजी आज कितपत कालसुसंगत आहेत? 

- गांधीजींचे विचार सार्वकालिक आहेत. त्यांनी स्वच्छतेपासून ते पर्यावरणापर्यंत, आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत मांडलेले विचार आजही पथदर्शी आहेत, यावरून ते किती दूरगामी चिंतन करीत याची प्रचिती येते. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, साधनशुचिता ही तत्त्वे कधीच जुनी होऊ शकत नाहीत. आज आपण पाणी जपून वापरण्याविषयी, स्वच्छतेच्या आग्रहाविषयी बोलतो. गांधीजींनी हे तेव्हाच सांगून ठेवले होते. सध्या सुरू असलेले हिंसेचे थैमान पाहता, गांधींनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग किती योग्य होता, हे आज जगानेही मान्य केले आहे. नेल्सन मंडेलांपासून ते बराक ओबामांपर्यंत सर्वांनी गांधींपासून प्रेरणा घेतली, ही बाब गांधीविचारांच्या वैश्‍विकतेवर व सार्वकालिकतेवर शिक्‍कामोर्तब करणारी आहे.