Mon, Sep 21, 2020 18:27होमपेज › Nashik › पोलिसांच्या कामाची वेळ आठ तास करावी

पोलिसांच्या कामाची वेळ आठ तास करावी

Last Updated: Feb 14 2020 11:48PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे पोलीस कर्मचार्‍यांच्या कामाची वेळ  आठ तास करावी. तसेच त्यांना साप्ताहिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आयटकने केली आहे. 

आयटकतर्फे शुक्रवारी (दि.14) जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केल्याबद्दल सरकारचे कौतुक आहे. मात्र, राज्यातील विविध विभागांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांना रिक्तपदी कायम केल्यास कारभारात गतिमानता येईल. 

राज्यातील कायदा - सुव्यवस्थेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या विविध प्रश्नांवर विचार होणे गरजेचे आहे. भारतात दर एक लाख लोकसंख्येमागे केवळ 138 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. पाकिस्तानात हेच प्रमाण 181 तर अमेरिकेत 2,988 तसेच बांगलादेेशात 154 तर इंगल्डमध्ये 305 इतके आहे. त्यातच देशातील विविध आंदोलन, मोर्चे, राजकीय नेते, न्यायव्यवस्था अशा ठिकाणी मोठे पोलीस बळ लागते. वाढत्या गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचार रोखताना पोलिसांना अल्प काळ मिळतो. त्यामुळे पोलिसांच्या कामाचे आठ तास करावेत. तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व वस्त्रांतरगृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर आयटकचे राजू देसले, व्ही. डी. धनवटे, सखाराम दुर्गुडे, विजय दराडे, अनिल बुचकुल, सुवर्णा मेतकर, मनीषा खैरनार आदींची नावे आहेत.

 "