Wed, Jun 03, 2020 07:51होमपेज › Nashik › पिस्तूल तस्करी करणारा जेरबंद

पिस्तूल तस्करी करणारा जेरबंद

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:34PMधुळे : प्रतिनिधी

मध्य प्रदेशातून नाशिकला बनावट पिस्तूल घेऊन जाणार्‍या तस्करास पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले आहे. संशयितांकडून तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या संशयिताचा मध्य प्रदेशातील पिस्तूल तस्कर टोळीशी संपर्क आहे. त्यामुळे टोळीच्या मुख्य म्होरक्याच्या मुसक्या पोलीस आवळणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कारवाईनंतर माहिती देण्यासाठी पोलिसांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहायक उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, तसेच कबीर शेख, रफिक पठाण, राहुल सानप, मोहमद मोबीन यांच्यासह पथकातील कर्मचारी उपस्थित होते. माहिती देताना अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे यांनी सांगितले की, गेल्या आठवडयात शिरपूर तालुक्यातील हाडाखेड टोलनाक्यावरून 1 तसेच मोहाडी परीसरातुन दोन पिस्तुले जप्त करण्यात आलेले होते. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा मध्य प्रदेशातील तस्करांबरोबर संपर्क असल्याचे तपासात आढळून आलेले होते.

त्यासाठी या आरोपींच्या भ्रमणध्वनीचे रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. यात या आरोपींनी मुंबई, नाशिक तसेच मध्य प्रदेशात  संपर्क केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एका पोलिस पथकाला मध्य प्रदेशातील पानसेमल येथे कारवाई करण्यास पाठविण्यात आले. या पथकाने एका संशयिताला ताब्यात  घेतले. मात्र, पोलिसांचा संशय येताच त्याने झटापट करून पलायन केले.  दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान शिवारातील टोलनाक्यावरून एक व्यक्ती हत्यारांचा साठा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलीस पथकाला एक युवक हातात बॅग घेऊन संशयितपणे हॉटेलबाहेर उभा असल्याचे दिसुन आले. या तरुणास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन पिस्तुल आणि सहा काडतुसे आढळून आले. हा तरुण मध्य प्रदेशातील घेगावचा रहाणारा असून त्याचे नाव राजू सुरसिंग पवार आहे. संशयिताचा राज्यभरातील महत्त्वाच्या गावात हत्यार पुरवठा करणार्‍या गँगबरोबर संबंध असुन या गँगच्या म्होरक्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पानसरे यांनी सांगितले.