Fri, Jun 05, 2020 18:03होमपेज › Nashik › मालेगावी लोकसुनावणीत याचिकाकर्त्याला धक्काबुक्की

मालेगावी लोकसुनावणीत याचिकाकर्त्याला धक्काबुक्की

Published On: Aug 23 2019 1:33AM | Last Updated: Aug 22 2019 11:45PM
मालेगाव : प्रतिनिधी

नागरी आरोग्य धोक्यात आणणार्‍या प्रदूषणासंदर्भातील नागरिकांचे म्हणणे जाणण्यासाठी घेतलेल्या लोकसुनावणीतच तक्रारदारांची मुस्कटदाबी करण्यात आली. विशेषतः बेकायदेशीर कारखान्यांचा मुद्दा छेडणार्‍या याचिकाकर्त्याला थेट व्यासपीठावरच धक्‍काबुक्‍की करण्यात येऊन अक्षरशः हाकलून लावले गेले. या दबावतंत्राकडे पॅनलने बघ्याची भूमिका घेत एकप्रकारे गोंधळींना अभय दिले असले तरी न डगमगता जागरूक नागरिकांनी प्रदूषणासंदर्भातील तक्रारी नोंदविल्या.

नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेवर दि. 9 जुलै 2019 रोजी सुनावणी होऊन मालेगाव शहरात प्रदूषण करणार्‍या घटकांविषयी थेट लोकांच्या तक्रारी जाणण्यासाठी सुनावणी घेण्याचे आदेश होते. त्याप्रमाणे गुरुवारी (दि.22) दुपारी तीन वाजता हॉटेल मराठा दरबारच्या हॉलमध्ये संयुक्त पर्यावरण समिती, वन व हवामान बदल मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मालेगाव महापालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने लोकसुनावणी घेण्यात आली. या पॅनलमध्ये  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय संचालक भारतकुमार शर्मा, शास्त्रज्ञ अरविंदकुमार झा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे. बी. रंगेवार, क्षेत्रीय अधिकारी संजीव रंदासवी यांचा समावेश होता.

प्रारंभी आमदार आसिफ शेख यांनी सायजिंग व प्लास्टिक कारखान्यांमुळे प्रदूषण होते, हा मुद्दाच खोडून काढला.  आर्थिक स्थिती बिकट असलेली मालेगाव महापालिका भुयारी गटार, रस्ते आदी सुविधा देण्यात कमी पडते. यासह वाढती वाहनसंख्या व अन्य कारणे प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत, असे ते म्हणाले. मालेगाव हे यंत्रमागाचे शहर असून, सायजिंग कारखाने बंद पडल्यास बेरोजगारीतून गुन्हेगारी वाढेल, अशी भीती व्यक्‍त करत त्यांनी प्लास्टिक व सायजिंग कारखानदार आवश्यक त्या कायदेशीर पूर्तता करण्यास तयार आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी सूचना मांडून ते सुनावणीतून बाहेर पडले. यादरम्यान, बेकायदेशीर प्लास्टिक व सायजिंग कारखान्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी हरित लवादाकडे याचिका दाखल करणारे ग्रीन ड्राइव्ह संघटनेचे कलिम अब्दुल्ला हे तक्रार मांडण्यासाठी व्यासपीठाकडे आले. काही लोकांनी आवेशात येत एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कलिम यांना बाहेर जाण्यासाठी दरडावले. परंतु, कलिम हिमतीने पुढे गेले असता त्यांना धक्‍काबुक्‍की झाली.

प्रशासनाची भूमिका संशयास्पद

संवेदनशीलतेच्या मुद्यावर प्रशासन अनेक उपक्रमांना परवानगी नाकारते. तेथे शहराचे अर्थकारण अवलंबून असणार्‍या प्लास्टिक - सायजिंग कारखान्यांशी निगडित लोकसुनावणीप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, याकडे साफ दुर्लक्ष कसे केले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मर्यादित हॉलमध्ये शेकडोंची गर्दी झालेली असताना कोणताही पोलीस बंदोबस्त तैनात नव्हता. गोंधळ झाल्यानंतर काही वेळाने पोलीस आले, त्यांनी रस्त्यावरील जमाव पांगवला. शिवाय, प्रदूषणासंदर्भात सुनावणीला महसूल व महापालिकेचे अधिकारी उशिरानेच आले. मनपा उपायुक्‍तांचा अपवाद वगळता इतर अधिकारी हजेरी लावून माघारी फिरले. प्रारंभापासूनच काही लोक आक्रमकपणे गोंधळ घालत दबाव निर्माण करत होते. सुरक्षेची हमी नसल्याने धोका पत्करतच अनेकांना तक्रार करावी लागल्याचे दिसून आले.

हिमतीने नोंदविल्या तक्रारी

मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करणार्‍यांना केवळ दर्पयुक्त दुर्गंधीने मालेगाव आल्याचे कळते. अशी वस्तुस्थिती असताना लोकसुनावणीत शहर प्रदूषणमुक्‍त असल्याचे बिंबवण्याचा केविलवाणा अन् तेवढाच आक्रमक पवित्रा अनेकांनी घेतला. झुंडशाहीचा अवलंब केला गेला. तरी बोटावर मोजण्याइतक्या जागरूक नागरिकांनी हिमतीने तक्रारी नोंदवल्या. प्लास्टिक गिट्टी, सायजिंग, हड्डी तसेच साबण कारखान्यातून बाहेर पडणारे प्रदूषण थांबविण्याचे आर्जव करण्यात आले. सवंदगावकरांनी कत्तलखान्यांना विरोध दर्शविला.