Wed, Jun 03, 2020 21:08होमपेज › Nashik › मनपात ‘खुशी’, जिल्हा परिषदेत ‘गम’

मनपात ‘खुशी’, जिल्हा परिषदेत ‘गम’

Last Updated: Oct 08 2019 1:30AM
नाशिक : प्रतिनिधी

मनपा कर्मचार्‍यांना काही दिवस उशिरा का होईना परंतु, वेतन आणि साडेबारा हजार रुपये दिवाळी सणानिमित्त अ‍ॅडव्हान्स मिळाल्याने कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. येत्या दोन दिवसात सानुगह अनुदानही अदा केले जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी यंदाही गोड जाणार आहे. मात्र दिवाळी सानुग्रह अनुदानाची कर्मचार्‍यांना प्रतीक्षा आहे.

सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा न झाल्याने म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे निवेदनाद्वारे आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली होती. दरमहा होणारे वेतन एक किंवा दोन तारखेच्या आत न झाल्यास संघटनेमार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरची 7 तारीख उजाडूनही वेतन न झाल्याने बहुतांश कर्मचार्‍यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. 

वेतनाबरोबरच दिवाळी सानुग्रह अनुदान आणि अ‍ॅडव्हान्सही 9 ऑक्टोबरच्या आत देण्याची मागणी संघटनेने केली होती. मनपातील सर्व कर्मचार्‍यांचे मासिक वेतन चार ते पाच महिन्यांपासून पाच तारखेनंतरच करण्याची कार्यवाही लेखा व वित्त विभागाकडून केली जात आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनातून घर कर्जाचा हप्ता, वाहन कर्जाचा हप्ता तसेच मुलांचे शैक्षणिक शुल्क अदा करताना कर्मचार्‍यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश कर्मचार्‍यांना खासगी वित्त संस्थांकडून कर्ज घेतलेले असल्याने हप्ता अदा करण्याची तारीखही बदलून दिली जात नसल्याने कर्मचार्‍यांसमोर आर्थिक पेच निर्माण झालेला आहे. यामुळे दरमहा 1 किंवा 2 तारखेपर्यंत वेतन न झाल्यास त्यांना आर्थिक दंड सहन करावा लागतो. यामुळे दरमहा वेतन दोन तारखेच्या आत करण्याविषयी सर्व खातेप्रमुख आणि वित्त विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार 7 ऑक्टोबर रोजी  कर्मचार्‍यांचे वेतन आणि दिवाळी सणासाठी अ‍ॅडव्हान्स अदा करण्यात आला आहे. यामुळे कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला.