Tue, May 26, 2020 16:36होमपेज › Nashik › ओझर, त्र्यंबक येणार नाशिक  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत

ओझर, त्र्यंबक येणार नाशिक  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत

Last Updated: Feb 18 2020 1:51AM
ओझर : मनोज कावळे

जाणार जाणार म्हणून तब्बल एक दशकापासून धूळ खात पडलेला ओझर पोलीस स्टेशनचा नाशिक पोलीस आयुक्तालयात समावेशाचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून, येत्या 1 मे रोजी याची अधिकृत घोषणा होणार आहे. ओझरबरोबरच त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुका, वाडीवर्‍हे व सिन्नर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या काही गावांचा देखील आयुक्तालयात समावेश होणार आहे.

मुंबई - आग्रा महामार्गावर असलेल्या ओझरचा वाढत्या विस्तारासोबतच  दिवसागणिक वाढत असलेले नागरीकरण लक्षात घेता दहा वर्षापूर्वी ओझर पोलीस ठाण्याचा नाशिक पोलीस आयुक्तालयात समावेश करावा, यासाठी वरिष्ठ पातळीवरील गतिमान हालचाली सुरू झाल्या होत्या. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या असलेल्या मिग विमान कारखाना, वायुसेनेचा तळ आणि विमानतळ यासारख्या महत्वाच्या ठिकाणांमुळे ओझरला अतिमहत्वाच्या लोकांचा कायमच राबता राहतो. दहा वर्षापूर्वी शासनाच्या गृहखात्यानेच ओझरचे वाढते नागरिकीकरण व इतर महत्वाच्या बाबी लक्षात घेत ओझर पोलीस ठाण्याचे नाशिक पोलीस आयुक्तालयात समावेश करावा, असा प्रस्ताव शासनास सादर केला होता. परंतु, त्यावेळी समावेश करताना नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या कर्मचार्‍यांसह समावेश करण्यास ग्रामीणच्या ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी विरोध केल्याची चर्चा त्यावेळी झाल्याने हा प्रस्ताव तब्बल दहा वर्षे धूळ खात पडला होता.

याबाबतच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या असून, गृहखात्याने महसूल विभागकडून ओझरसह नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर, वाडीवर्‍हे, सिन्नर या ठिकाणांहून अहवाल मागवत शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. ओझर पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे ओझर शहर, एचएएल, दिक्षी, बाणगंगानगर यांच्यासह दिंडोरी पोलीस ठाण्याअंर्तगत असलेले जानोरी, जऊळके तसेच विमानतळ आणि सध्या नाशिक तालुक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले सिध्दपिंप्री ही गावे  ओझर पोलीस ठाण्याला जोडण्यात येणार आहे. सध्या ओझर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेले दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे व कसबे सुकेणे ही गावे सोयीनुसार पिंपळगाव अथवा सायखेडा पोलीस ठाण्याला जोडण्यात येणार आहे. तर सिन्नर तालुक्यातील 40 गावांचा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे, वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली काही गावेदेखील आयुक्तालयाला जोडण्यात येणार आहे.