Fri, Jun 05, 2020 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › उपमुख्य अधिकार्‍यांचा पदभार तातडीने काढा

उपमुख्य अधिकार्‍यांचा पदभार तातडीने काढा

Published On: Aug 22 2019 1:49AM | Last Updated: Aug 21 2019 11:58PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्याकडून कामकाजासंदर्भात होणारी टोलवाटोलवी तसेच दस्तुरखुद्द सभापती अर्पणा खोसकर यांनाच बेदखल केले जात असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत तापला. सदस्यांची मागणी अन् खोसकर यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिल्यानंतर मुंडे यांचा पदभार काढून घेण्याचे आदेश अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिले.

सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या इमारतीतील कै. रावसाहेब थोरात सभागृहात सभेचे कामकाज झाले. मुंडे यांच्या कारभारावर खोसकर या अनेक दिवसांपासून नाराज होत्या.

कोणत्याही प्रकारच्या योजना तसेच कामकाजासंदर्भात विश्‍वासात घेतले जात नसल्याचे खोसकर यांनी थेट ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत नाराजीला वाट मोकळी करून दिली. त्यावेळी ना. भुसे यांनी सभापतींना सन्मानाची वागणूक द्या म्हणून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना सुनावले होते. त्यानंतर विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासंदर्भातही खोसकर यांना अंधारात ठेवून मुंडे यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबई गाठली होती. त्यावेळी हा विषय सभेत उपस्थित झाल्यावर मुंडे यांचा पदभार काढून घेण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली होती. त्यावेळी ही खोसकर आक्रमक झाल्या होत्या. अखेर अध्यक्षांच्या दालनात गिते, मुंडे आणि खोसकर यांना एकत्रितरीत्या बसवून वाद माफी मागविण्यावर भागविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मुंडे यांचा कारभार सुधारला नसल्याचे बुधवारी स्थायी समितीत उघड झालेल्या कारभारावरून समोर आले. 

महिला आणि मुलींना व्यावसायिक-तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी तीनदा निविदा काढूनही दोन महिन्यांत पुढील कार्यवाही न झाल्याचे सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी फाइल का अडली, हे पडताळून पाहण्यासाठी फाइल सभागृहात बोलाविण्याची मागणी खुद्द खोसकर यांनीच केली. फाइल सभागृहात पोहोचल्यावर मुंडे यांच्याकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने सदस्य अधिकच संतप्त झाले. बांधकाम सभापती मनीषा पवार यांनीही मुंडे यांचे कान टोचले. 

सदस्यांनी मुंडे यांचा पदभार काढून तो अन्य अधिकार्‍याकडे सोपविण्याची मागणी केली. खोसकर यांनीही सुरात सूर मिसळत थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला. लागलीच कोर्‍या कागदावर सही करून तो सांगळे यांच्याकडे सादर केला. यावरून सांगळे यांनीही मुंडे यांना कडक शब्दात खडसावले. पण, सदस्य पदभार काढून घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याने सांगळे यांनाही तसे आदेश देणे भाग पडले. या चर्चेत सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, भास्कर गावित यांनी भाग घेतला.