Wed, Aug 12, 2020 09:56होमपेज › Nashik › ‘पसा’तील दुर्गंधीमुळे कलावंतांचे उघड्यावर जेवण

‘पसा’तील दुर्गंधीमुळे कलावंतांचे उघड्यावर जेवण

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:12PMनाशिक : प्रतिनिधी

सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहाविषयी कलावंतांच्या अनेक तक्रारी असताना, त्यात आता दुर्गंधी व अस्वच्छतेच्या तक्रारींचीही भर पडली आहे. नाट्यगृहातील दुर्गंधी असह्य झाल्याने कलावंतांना अक्षरश: उभ्याने उघड्यावर जेवण घेण्याची वेळ रविवारी (दि.18) रात्री आली. प्रख्यात बासरीवादक अमर ओक यांच्याबाबत हा प्रकार घडला. या प्रकाराबद्दल कलावंतांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. 

शहरातील प्रमुख नाट्यगृह असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण सुरू असल्याने नाटकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची भिस्त सध्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहावर आहे. मात्र, या नाट्यगृहातील अव्यवस्थेेविषयी कलावंतांच्या अनेक तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी नाट्यगृहात काही कामे करण्यात आली. तथापि, रविवारी रात्री नाट्यगृहाच्या अव्यवस्थेचा फटका बासरीवादक अमर ओक व त्यांच्या साथीदारांना बसला. रविवारी सायंकाळी नाट्यगृहात ओक यांचा ‘अमर बन्सी’ हा बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, नाट्यगृहात ग्रीन रूमपासून ते थेट रंगमंचापर्यंत असह्य दुर्गंधी येत होती.

यासंदर्भात नाट्यगृह व्यवस्थापकांना विचारणा केली असता, रविवारच्या सुटीमुळे कर्मचारी न आल्याने स्वच्छता होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले. ओक यांनी तशाच स्थितीत कार्यक्रम सुरू केला. मात्र, दुर्गंधीमुळे रंगमंचावर बसणेही असह्य झाले होते. बासरीवादन हे श्‍वासावर अवलंबून असल्याने वादनात योग्य परिणाम साधणे ओक यांना अवघड जात होते. कार्यक्रम संपल्यानंतर कलावंतांसाठी जेवण आणण्यात आले. मात्र, दुर्गंधीमुळे नाट्यगृहात जेवणे शक्यच नसल्याने कलावंतांनी ‘पसा’च्या आवारात जेवण लावण्यास सांगितले व उभ्याने उघड्यावरच जेवण केले. 

या प्रकाराविषयी ओक यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यापूर्वी आपण कालिदास कलामंदिरात कार्यक्रम केले आहेत. साईखेडकर नाट्यगृहात प्रथमच कार्यक्रम केला. मात्र, दुर्गंधीमुळे आत बसवतही नसल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. पावणेदोनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या सावानात कलावंतांना आलेला हा अनुभव क्‍लेषदायी असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणी सावानाचे नाट्यगृह सचिव धर्माजी बोडके व व्यवस्थापक दिलीप बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.