Fri, Jun 05, 2020 15:51
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › भाजपाची भूमिका मान्य नसणार्‍यांना रस्ता मोकळा

भाजपाची भूमिका मान्य नसणार्‍यांना रस्ता मोकळा

Published On: Sep 28 2019 11:27PM | Last Updated: Sep 28 2019 11:27PM
नाशिक : प्रतिनिधी

बाहेरच्या पक्षांमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या नेते व पदाधिकार्‍यांना भाजपाची भूमिका स्वीकारावीच लागेल. पक्षाची भूमिका मान्य नसणार्‍या नेत्यांना पक्षाबाहेरचा रस्ता खुला आहे, असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कार्यामुळे हक्काचा मतदार भाजपाकडे वळल्याने नेत्यांपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. पाच वर्षांतील सरकारच्या राजकीय कामगिरीवर निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी (दि.28) नाशिक दौर्‍यावर आले असता सहस्रबुद्धे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्य प्रवक्‍ते माधव भंडारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे सर्वसामान्य मतदार भाजपाच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्या प्रमाणात विरोधी पक्ष अस्तित्वहीन झाला आहे. त्या पक्षांमधील नेत्यांपुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. परिणामी, अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, चर्चा केवळ राधाकृष्ण विखे-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या नेत्यांची होत आहे. यानिमित्ताने पक्षात मेगाभरती झाल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात मात्र, राज्यातील 16 आमदारांनी आतापर्यत राजीनामे दिले असून, त्यातील 10 भाजपात आले. तर काही भाजपातून दुसर्‍या पक्षातही गेल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले. 

भंंडारी म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सरकारने योग्यरीतीने हाताळला. त्यामुळे मराठा समाजात भाजपाबद्दल सकारात्मक विचार आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्‍न केंद्र सरकारच्या अखत्यारित असताना मुख्यमंत्र्यांनी एक हजार कोटी रुपये धनगरांच्या विकासासाठी दिले. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्‍न कोणी सोडवेल तर भाजपाच सोडवेल, असा ठाम विश्‍वास या समाजात निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्‍तशिवार, जलसंधारण, कालवा नव्हे तर जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा, रस्ते यांसह विविध क्षेत्रांत सरकारने प्रभावी कामे केल्याचे भंडारींनी स्पष्ट केले.  

भाजपा आत्मविश्‍वासाने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पायाभूत सुविधा, शेतमालाला भाव, शेतमालासाठी थेट बाजारपेठ आदी विषयांवर निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे असतील, अशी माहिती भंडारी 
यांनी दिली.

आता समान नागरी कायदा, 

लोकसंख्या नियंत्रणासाठी काम केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने 100 दिवसांच्या कार्यकाळात 370 कलम रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दोन महिन्यांमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट कर कमी करण्यासह निरनिराळे निर्णय घेतले आहेत. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून प्लास्टिकबंदीसह समान नागरी कायदा तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार काम करणार असल्याचे सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.  आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका मांडल्याने पाक ‘बॅकफूट’वर गेल्याचे ते म्हणाले.