Wed, Jun 03, 2020 17:57होमपेज › Nashik › कांद्याचा भाव जाणार दीडशेपार?

कांद्याचा भाव जाणार दीडशेपार?

Last Updated: Dec 03 2019 1:16AM
नाशिक : प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या जेवणातून हद्दपार झालेला कांदा येत्या काही दिवस तरी मध्यम वर्गीयांच्याही जीवनातून हद्दपार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. बाजार समित्यांमध्ये कांद्याने साडेबारा हजार रुपये प्रती क्विंटलचा विक्रमी भाव गाठला असून, परिणामी, किरकोळ बाजारात कांदा दीडशे रूपयांचा भाव पार करेल, अशी शक्यता आहे. 

जिल्ह्यात सोमवारी (दि.2) उन्हाळ आणि लाल कांद्याने शंभरी गाठली. येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 12,250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर, त्या खालोखाल सटाणा, वणी बाजार समितीत 12 हजार रुपयांचा दर मिळाला. लाल कांद्याचेही भाव चढेच होते.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक घटत चालली आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे उन्हाळ व लाल कांदा खराब झाला. टाकलेली रोपेही नष्ट झाली. परिणामी, बाजार समितीत कांद्याची आवक घटू लागल्याने कांदा दरात वाढ झाली. काही दिवसांपासून 7 ते 8 हजार रुपये सरासरी दराने विक्री होणार्‍या कांद्याने सोमवारी शंभरीच गाठली. येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान 2,000, जास्तीत जास्त 12,250 तर सरासरी 11,300 रुपये दर मिळाला. एकूण कांदा आवक 800 क्विंटल झाली होती. सटाणा बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 12 हजार प्रती क्विंटल दर मिळाला. लाल कांदा 8 हजार रुपये दराने विक्री झाला. देवळा बाजार समितीत उन्हाळ कांदा कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 9,700, सरासरी 8,800 रुपये दर मिळाला. एकूण आवक 800 क्विंटल झाली होती. लाल कांदा कमीत कमी 3 हजार, जास्तीत जास्त 8,400 तर सरासरी 7 हजार रुपयांनी विक्री झाला. एकूण आवक 2 हजार क्विंटल झाली.पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 11,300, कमीत कमी 4 हजार, सरासरी 9,500 रुपये दर मिळाला. लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची 1,850  क्विंटल आवक झाली. जास्तीत जास्त 8,152 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. लाल कांद्याला कमीत कमी 2000, सरासरी 7,100 तर जास्तीत जास्त 8,152 रुपये भाव मिळाला.

ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी

किरकोळ बाजारात कांद्याने शंभरी ओलांडताच केंद्र सरकारने एमएमटीसीमार्फत सव्वा लाख टन कांदा आयात करण्यास सुरवात केली आहे. मात्र, हा कांदा येवूनही देशातील फक्त चार ते पाच दिवसांची गरज भागणार आहे. त्यामुळे आता कांद्याची सगळी मदार ही नवीन लाल कांद्यावरच अवलंबून राहिल, असे दिसत आहे. त्यामुळे  कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यातून अश्रू काढत आहे.