Sat, Jul 04, 2020 21:28होमपेज › Nashik › कांदा ४०० रुपयांनी घसरला

कांदा ४०० रुपयांनी घसरला

Last Updated: Oct 11 2019 11:08PM
लासलगाव : वार्ताहर
आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तसेच उन्हाळ कांद्याची प्रतवारी घसरल्याने मागणीत घट झाल्याने लासलगाव बाजार समितीत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी चारशे रुपयांची प्रतिक्विंटलमागे घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली.

लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी कांद्याच्या लिलावासाठी 581 वाहनांतून 6 हजार 850 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला जास्तीत जास्त 3452 रुपये, सरासरी 3001 रुपये, तर कमीत कमी 1200 रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला. तर गुरुवारी कांद्याच्या लिलावासाठी 410 वाहनांतून 4 हजार क्विंटल 802 कांद्याची आवक झाली होती. त्याला जास्तीत जास्त 3825 रुपये, सरासरी 3401 रुपये, तर कमीत कमी 1400 रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला होता.

राज्यातील कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना केंद्रीय पथकाने लासलगाव बाजार समितीत दोन वेळा भेट देऊन संपूर्ण माहिती घेतल्यानंतर कांदा निर्यातबंदी आणि व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या साठ्यावर 500 क्विंटलची मर्यादा आणल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात चढउतार होत आहे. नवीन लाल कांद्याची आवक निर्यातबंदी आणि व्यापार्‍यांच्या साठेबाजीवर असलेल्या मर्यादेमुळे देशांतर्गत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याचे निर्यातदार व्यापारी मनोज जैन सांगत आहे.

भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी चांदवड येथे आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याचे बाजारभाव पडून देणार नसल्याचे सभेदरम्यान जाहीर केले होते. मात्र, आज चारशे रुपयांची घसरण झाली आहे. आता मुख्यमंत्री ही चारशे रुपयांची घसरण भरून देणार का, असा प्रश्न आता आमच्या कांदा उत्पादकांना पडला आहे.
- निवृत्ती न्याहारकर,
कांदा उत्पादक, वाहेगावसाळ