Fri, May 29, 2020 09:18होमपेज › Nashik › लासलगावला कांदा 2,481 रुपये क्‍विंटल

लासलगावला कांदा 2,481 रुपये क्‍विंटल

Published On: Aug 22 2019 1:49AM | Last Updated: Aug 22 2019 1:49AM
लासलगाव : वार्ताहर

राज्यासह देशातून कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याच्या दरामध्ये पंधरा दिवसांच्या तुलनेमध्ये दुप्पट वाढ झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी (दि.21) येथील मुख्य बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याला सरासरी 2,350 रुपये तर जास्तीत जास्त 2,481 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

देशातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी  लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उशिरा पावसाचे आगमन झाल्यामुळे कांदा लागवड उशिरा झाली आहे. त्यामुळे नवीन कांदा येण्यास दीड ते दोन महिन्यांचा अवधी असल्याने कांदा असाच भाव खात राहणार असे जाणकारांचे मत आहे. देशातून कांद्याची मागणी वाढत आहे. मात्र, मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने कांद्याचे भाव हे वाढलेले दिसत आहे. कर्नाटकात पावसामुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे लासलगाव आणि बंगळुरू मार्केटमध्ये कांदा दराने उसळी घेतली आहे. 3 ऑगस्ट रोजी कांद्याचे लिलाव झाले तेव्हा उन्हाळ कांद्याला सरासरी 1,300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. अवघ्या पंधरा दिवसांमध्ये कांद्यात जवळपास दुप्पट भाव वाढ झाली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असलेला कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेला होता. परंतु, हवामानातील बदलामुळे या कांद्याचा वजनामध्ये आणि प्रतवारीमध्ये 30 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे आज तरी भाव दिसत असला तरी वजनात घट झाल्यामुळे शेतकर्‍याच्या हातात खूप काही लागलेले नाही.

कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एक तृतियांश कांदा महाराष्ट्रात पिकवला जातो. महाराष्ट्रापाठोपाठ कांदा लागवडीत कर्नाटक दुसर्‍या क्रमांकावर आहे. कर्नाटकमध्ये यंदा जून आणि जुलैच्या सुरुवातीला पाऊस कमी झाल्यामुळे कांद्याची लागवड कमी झाली. मध्य कर्नाटकात सुमारे 30 टक्के कमी लागवड झाली. आता उत्तर कर्नाटकात पुरामुळे कांद्याच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. सुमारे 20 टक्के पिकाला फटका बसल्याचे अनुमान आहे. या सार्‍याचा परिणाम म्हणून यंदा कर्नाटकात कांदा उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. लासलगाव येथे कमीतकमी 900 रुपये सरासरी 2,350 रुपये तर जास्तीत जास्त 2,481 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले.