Tue, Aug 04, 2020 13:46होमपेज › Nashik › जळगाव : १० वर्षीय मुलीवर अत्‍याचार करणाऱ्या नराधमाला बेड्या 

जळगाव : १० वर्षीय मुलीवर अत्‍याचार करणाऱ्या नराधमाला बेड्या 

Last Updated: Jul 11 2020 3:36PM
जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा 

शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर एका १० वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्‍याची घृणास्‍पद घटना काल (शुक्रवार) घडली होती. या प्रकरणातील संशयीत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सौरभ वासुदेव खरडीकर (वय २५, रा. राधा कृष्ण नगर) या संशयित आरोपी तरुणाला इंद्रप्रस्थ नगरमधून नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. 

 पीडित मुलगी ही आपल्या आजीसोबत गोलाणी मार्केटसह इतर भागात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवीत होती. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  एका अज्ञात व्यक्तीने गोलाणी मार्केटलगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे उभे असलेल्या पीडित मुलीला तुला खाऊ देतो म्हणून तिसऱ्या मजल्यावर नेले. या ठिकाणच्या एका मुतारीत नेत त्या व्यक्तीने मुलीवर पाशवी अत्याचार  केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. 

पीडित मुलगी रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रडत रडत खाली. आपल्या आजीकडे आली आणि सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पीडित मुलीला सोबत घेत पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी मार्केटमधील दुसऱ्या मजल्यावरील बालाजी प्लेसमेंट बाहेर सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, संशयीत आरोपी हा पीडित मुली सोबत कॅमेऱ्यात कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे सौरभ वासुदेव खरडीकर (वय २५, रा. राधाकृष्ण नगर) या आरोपीची  पोलिसांना ओळख पटली. त्यानुसार त्याला इंद्रप्रस्थ नगरमध्ये फिरत असतांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्‍याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्‍याने आपल्‍या कृत्याची कबुली दिल्‍याची माहिती कळत आहे.