Mon, Jun 01, 2020 06:22होमपेज › Nashik › एकाच शेतकरी कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

एकाच शेतकरी कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jul 23 2019 1:18AM | Last Updated: Jul 23 2019 1:18AM
धुळे : प्रतिनिधी

सिंचन विहिरीचे शासकीय अनुदान मिळण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकरी परिवारातील चौघांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना धुळे- नंदुरबारच्या सीमेवर असलेल्या मोराणे शिवारात घडली. या चौघांनाही नंदुरबार येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

मोराणे येथील शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांना त्यांच्या गट क्रमांक 83/1/3 मधे 1.35 आर क्षेत्र असणार्‍या शेतात सिंचन विहीर मंजूर झाली आहे. त्यासाठी त्यांनी अभियंत्याकडून आखणी करून खोदकामही पूर्ण केले आहे. मात्र, धनगर यांनी सर्व शासकीय अटींचे पालन करूनही प्रशासनाकडून त्यांना बँक खात्यात अनुदान जमा होत नसल्याने ते पाठपुरावा करत होते. पण, यात त्यांना यश आले नाही.  त्यामुळे  त्यांनी या आधी 1 एप्रिल रोजी धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोरच पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पण ऐनवेळी शहर पोलिसांनी धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला होता. दरम्यान, सोमवारी धनगर यांच्यासह योगीताबाई धनगर, मुलगा भूषण धनगर व निखिल धनगर यांनी शेतातील विहिरीजवळ जावून विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्रास होत असल्याचे काही नागरिकांना दिसल्याने त्यांनी धुळे व नंदुरबार पोलिसांना ही माहिती कळवली. त्यानुसार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र जाधव, संजय मोरे, बापू बागूल, विजय सोनवणे यांच्यासह दोंडाईचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धनगर परिवाराला नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या सर्वाची प्रकृती स्थिर आहे.