Mon, Jul 06, 2020 23:13होमपेज › Nashik › नाशिक : राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून पूरग्रस्ताना एक दिवसाचे वेतन

नाशिक : राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून पूरग्रस्ताना एक दिवसाचे वेतन

Published On: Aug 09 2019 4:02PM | Last Updated: Aug 09 2019 3:40PM

संग्रहित छायाचित्रचांदवड (नाशिक) : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कोल्हापूर, सातारा सांगलीसह राज्यातील पुरग्रस्त कुटुंब व मुक्या जनावरांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देणार असल्याची माहिती राज्य नेते काळूजी बोरसे पाटील यांनी दिली.

कोल्हापूर, सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे तर भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्यांची आणि मुक्या प्राण्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. पुरग्रस्त बांधवांना यावेळी तत्काळ मदतीची गरज आहे. परंतु पूर ओसरल्यावर निवारा, आरोग्य, शेती, पुरग्रस्त बाधित शाळा, बालके यांच्यासाठी प्रचंड मदतीची गरज भासणार आहे.

शासन प्रयत्नशील आहेच, मात्र सर्वसामान्यांच्या मदतीसाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कर्तव्य भावनेने व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांतील सर्व शिक्षकांच्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची कपात करून जमा होणारी रक्कम पुरग्रस्त बांधवांच्या मदत व पुनर्वसनासाठी खर्च करावी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने घेतलेला हा निर्णय केवळ दात्रृत्वाच्या भावनेतून घेतला आहे असे मत काळूजी बोरसे पाटील यांनी सांगितले.

याबाबतचे लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, शिक्षक नेते शिवाजीराव साखरे, राज्य सरचिटणीस विजयजी कोंबे, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, राज्य कोषाध्यक्ष केदूजी देशमाने यांनी दिली. यावेळी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा नेते प्रकाश आहिरे, कार्याध्यक्ष पी. के. आहिरे, कोषाध्यक्ष साहेबराव पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.