Sun, Jun 07, 2020 11:48होमपेज › Nashik › दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

Published On: Sep 04 2019 1:55AM | Last Updated: Sep 03 2019 11:13PM
नाशिक : प्रतिनिधी

भक्तांच्या घरचा पाहुणचार घेतल्यानंतर मंगळवारी (दि.3) दीड दिवसाच्या गणरायाला भाविकांनी ‘पुढच्या  वर्षी लवकर या’, असे साकडे घालत निरोप दिला. यावेळी विसर्जनासाठी रामकुंड व गोदाकाठावर गर्दी पाहावयास मिळाली. 

घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोेत्सव मंडळांमध्ये सोमवारी (दि.2) गणेशाची वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी भाविकांनी दीड दिवसाच्या गणपतीला जड अंतःकरणाने निरोप दिला. यावेळी रामकुंड, गोदाकाठ, घारपुरे घाट, सोमेश्वर मंदिर परिसर, तपोवन आदी भागांमध्ये गणेश विसर्जनाची लगबग दिसून आली. यावेळी भाविकांनी दिलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया; पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने अवघा गोदाघाट परिसर दुमदुमून गेला. 

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मनपाने भाविकांना गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले. तसेच मूर्तीसोबत असलेले निर्माल्य गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. 

विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी याप्रसंगी रामकुंड, गोेदाघाट परिसरात पर्यावरण रक्षणाबद्दल जनजागृती केली. दरम्यान, विसर्जनावेळी कोणतेही विघ्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभाग सतर्क होता. त्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.