Tue, Jun 02, 2020 23:40होमपेज › Nashik › वृद्ध कलावंत सहा महिन्यांपासून मानधनाविना

वृद्ध कलावंत सहा महिन्यांपासून मानधनाविना

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 17 2019 11:22PM
नाशिक : प्रतिनिधी

समाजप्रबोधनाचे काम करणारे वृद्ध कलावंत गेल्या सहा महिन्यांपासून मानधनविना असल्याची बाब उजेडात आले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे असलेले काम आता थेट सांस्कृतिक संचालनालयाकडे गेले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

वृद्ध कलावंतांना मानधन देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जात आहे. वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, शाहीर, नाटककार, संबळ वादक, सनई वादक, बॅण्डपथक, वाघ्या मुरळी, तमाशा कलावंत आदींचा या योजनेत सहभाग आहे.पालकमंत्र्यांनी समितीची स्थापना केली असून, ही समितीच कलावंतांची निवड  करीत असते. दरवर्षी साठ कलावंत निवडून त्यांना मानधन दिले जात असते. वर्गवारीनुसार दर महिन्याला 2,300, 1,800 आणि 1,500 रुपये याप्रमाणे मानधनाची रक्कम ठरलेली आहे. समाजप्रबोधनाचे काम करणार्‍या या कलावंतांना आजारपण तसेच आपल्या गरजा भागविता याव्यात, असा मानधन देण्यामागील उद्देश आहे. हे खरे असले तरी गेल्या सहा महिन्यांपासून मात्र एकाही कलावंताला मानधन मिळाले नसल्याची बाब उजेडात आली आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे चौकशी केली असता गेल्या दीड वर्षांपासून मानधन देण्याचे काम सांस्कृतिक संचालनालय पाहत असल्याचे सांगण्यात आले. कलावंतांच्या यादीनुसार हे अनुदान थेट त्यांच्या खात्यावर संचालनालयच जमा करीत असल्याचेही सांगण्यात आले. दुसरीकडे मानधनासंदर्भात विचारणा करणार्‍या कलावंतांना समाजकल्याण विभागातील संबंधित अधिकारी मात्र धातुरमातूर उत्तरे देऊन माघारी पाठवित असल्याची तक्रार करण्यात आली आहे.खिशात पैसे नसल्याने औषधोपचाराचा खर्च भागविणेही कठीण झाल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे.

आंतरजातीय विवाह योजनेचे अनुदान रखडले

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता दीड महिना लागू होती. या काळात निधी प्राप्त झाला नाही. मुळात या योजनेसाठी असलेले बजेटच कमी करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. दोन- अडीच महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे म्हणजे कलावंतांना आताच मानधन मिळाले नाही तर पुन्हा आचारसंहितेत ते अडकण्याची शक्यता आहे. अर्जाची मागणी करणार्‍या कलावंतांना अर्ज उपलब्ध नसल्याचे सांगत बाहेर विशिष्ठ झेरॉक्स सेंटरवर पाठविले जात आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनाही वर्षाभरापासून प्रोत्साहनपर अनुदान दिले गेले नाही.