Tue, Jun 02, 2020 14:02होमपेज › Nashik › दमानियांविरोधात अखेर गुन्हा 

दमानियांविरोधात अखेर गुन्हा 

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:40PMजळगाव : प्रतिनिधी

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लाचेच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह त्यांचे पती अनिष दिनेश दमानिया आणि इतर सात जणांविरोधात खडसे यांनी मुक्‍ताईनगर पोलिसात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत.

तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः खडसे फिर्यादी झाले. त्यांनी सायंकाळी मुक्‍ताईनगर पोलीस ठाण्यात  तक्रार दिल्यानंतर पोलिसांना तपासासाठी एक सीडीही सुपूर्द केली आहे. सतत आरोप करताना दमानिया म्हणत होत्या की, खडसे स्वतः खटला का दाखल करीत नाही कारण त्यांच्या मागे विविध चौकशींचा ससेमिरा लागलेला आहे, हे त्यांचे वाक्य दमानिया यांना भोवले.

सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांना दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी खडसेंना अडकवण्यासाठी आमिष दिल्याचा गौप्यस्फोट स्वतः इनामदार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर केला होता. माजी मंत्री खडसे यांना अडकवण्यासाठी काही रक्‍कम व कागदपत्रे देते व त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना मी कळवते, असे दमानिया यांनी आपल्याला सांगितल्याची कबुली इनामदार यांनी दिली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. हा संदर्भ घेऊन खडसे यांनी फिर्याद दिली आहे. लोकसेवकाला फसवण्याचा कट रचणे तसेच सरकारी कामात अडथळा आणणे, हे प्रयत्न केल्याप्रकरणी दमानिया यांच्यासह त्यांचे पती व अन्य सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले आहेत. आगामी काही दिवसांत काय होणार याची उत्सुकता लागून आहे.

तपासासाठी सीडी पोलिसांना सुपूर्द

खडसेंसह त्यांच्या कुटुंबीयांवर गेल्या दोन वर्षांपासून दमानियांचे आरोप सुरू आहेत तर कल्पना इनामदार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्या मुलाखतीची सीडी खडसे यांनी मुक्ताईनगरचे निरीक्षक अशोक कडलग यांना दिली असून, या सीडीद्वारे सत्य शोधून समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याबाहेर खडसे यांचे समर्थक कार्यकर्ते  उपस्थित होते.