Fri, Jun 05, 2020 14:48
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › ‘धुळे मनपा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार’

‘धुळे मनपा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार’

Published On: Jan 28 2019 6:10PM | Last Updated: Jan 28 2019 5:47PM
धुळे : प्रतिनिधी

धुळे महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमधे फेरफार केल्‍याचा आरोप करत ही निवडणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी आज लोकजनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या प्रवेशव्दाराला कुलूप लावून आपला राग व्यक्त केला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधीक ५० जागा घेत स्पष्ट बहुमत मिळविले. या निकालावर यापूर्वी सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी आक्षेप नोंदवत मनपावर मोर्चा देखील काढला होता. आता ईव्हीएम मशीनमधे घोटाळा केल्याचा आरोप करीत लोकजन शक्ती पार्टीने क्युमाईन क्लबजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.

या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आता पक्षाच्या महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण आणि जिल्हा महासचिव कुंदन खरात यांनी आमरण उपोषण सुरु केले. या आंदोलनाची देखील दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप साळवे, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे मधुकर चव्हाण, भूपेंद्र मोरे, बबलु शिंदे, गौतम वाघ, दत्तु साळवे, युवराज मोहीते, रवी नगराळे, रमेश देवरे, आदी कार्यकत्यांनी घोषणाबाजी करीत मनपाच्या प्रवेशव्दारास कुलूप ठोकले. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली.  

आंदोलकांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना आपल्या मागण्यांचे पत्र दिले असून, ईव्हीएम घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीत मशीनमधे गैरप्रकार झाल्याने ही निवडणुक रद्द करुन फेर निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.