होमपेज › Nashik › दुसर्‍या कर्जमाफीबाबत शेतकर्‍यांची अपेक्षा फोल

दुसर्‍या कर्जमाफीबाबत शेतकर्‍यांची अपेक्षा फोल

Published On: Sep 23 2019 1:57AM | Last Updated: Sep 22 2019 11:01PM
नाशिक : प्रतिनिधी

दुसर्‍यावेळी पुन्हा कर्जमाफी मिळण्याची आशा बाळगून असलेल्या शेतकर्‍यांची साफ निराशा झाली आहे. थकबाकीदारांची माहिती सरकारला सादर करण्यात आली असली तरी सरकारने त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसून आता तर आचारसंहिताही लागू झाल्याने निर्णय घेतला जाण्याची आशा पूर्णपणे मावळली आहे.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात 2008-09 मध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली होती. त्यानंतर जवळपास नऊ वर्षांनी पुन्हा कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना मिळाला आहे. 31 जून 2016 ला थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांचे दीड लाख रुपये कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आले. तर दीड लाख रुपयांवरील कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍याने दीड लाखांवरील रक्कम भरल्यास त्याचे दीड लाख रुपये कर्ज माफ करण्यात आले. या कर्जमाफीतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीत जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपये जमा झाले होते. 

दरम्यान, दुसर्‍यांदा पुन्हा कर्जमाफीचा निर्णय सरकारी पातळीवरून घेतला जाईल, अशी जोरदार चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, 2017-18, 2018-19 मधील वाटप झालेले कर्ज आणि थकबाकीदार, अशी माहिती सरकारनेही जिल्हा बँकेकडून नुकतीच मागविली होती. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे बँकेलाही वाटले होते. अगदी आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत बँक आशावादी होती. दुसरीकडे कर्जमाफीचा निर्णय होईल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनीही कर्ज फेडण्यास दरम्यानच्या काळात टाळाटाळच केली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी (दि.21) जाहीर केला आणि आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे आता कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.  

वसुलीसाठी बँक घेणार आक्रमक पवित्रा

शेतकर्‍यांनी कर्ज भरण्यास टाळाटाळ केल्याने जिल्हा बँक  आर्थिक संकटात सापडली आहे. म्हणजे, कर्जमाफीच्या चर्चेने शेतकर्‍यांनी कर्ज भरले नाही आणि या चर्चेचा परिणाम बँकेला भोगावा लागला आहे. पण, कर्जमाफीच होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने बँक आता वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.