Mon, Nov 18, 2019 23:56होमपेज › Nashik › .. म्हणून राज्यात निफाड सर्वाधिक थंड!

.. म्हणून राज्यात निफाड सर्वाधिक थंड!

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:34PM

बुकमार्क करा
नाशिक : रवींद्र आखाडे

‘थंड हवेचे ठिकाण’ अशी ओळख असलेल्या महाबळेश्‍वरला मागे टाकत जिल्ह्यातील निफाडमध्ये शुक्रवारी राज्यातील नीचांकी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यापूर्वीही हिवाळ्यात अनेकदा निफाडमध्ये राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी निफाडमध्येच तापमानाची एवढी घसरण का होते, या प्रश्‍नाचा ‘पुढारी’ने मागोवा घेतला. तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेनंतर यामागील अनेक शास्त्रीय कारणे समोर आली आहेत. 

निफाडमध्ये द्राक्षबागा, ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. नद्या-कालव्यांमुळे सतत राहणारा पाणीसाठा, पाणथळ जमीन अशी वरवरची अनेक तापमानातील घसरणीमागे असल्याचे बोलले जाते. तथापि, यानिमित्ताने अन्य अनेक कारणेही पुढे आली आहेत.  निफाड तालुक्याचा भूभाग हा समुद्रसपाटीपासून अत्यंत कमी उंचीवर आहे. या भागात उंच डोंगर नाहीत. निफाडमधील समतल भागावर हवेची घनता सर्वाधिक आढळून येते.

सरळ वाहणार्‍या हवेचा थर या खोलगट भागात साठून राहतो. अधिक घनतेची हवा जास्त दाबाचा पट्टा तयार करते. जास्त दाबाचा भाग म्हणजे कमी तापमान असे सूत्र मानले जाते. परिणामी, नाशिकमध्ये निफाडचे तापमान नेहमी नीचांकी नोंदविली जाते, अशी माहिती भौतिकशास्त्राचे अभ्यासक तथा केटीएचएम महाविद्यालयातील प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केलेल्या संशोधनातून पुढे आली आहे.

या व्यतिरिक्त निफाडमध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीचे प्रमाण लक्षणीय आहे. द्राक्षे, ऊस, कांदा, गहू, डाळिंब या पिकांचे अधिक प्रमाण निफाडमध्ये जास्त दाबाचा हवेचा थर टिकून ठेवते. थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाडमध्ये दिवाळीनंतरच्या रब्बी हंगामातील गहूदेखील उत्तम पिकतो. निफाडमध्ये वार्‍याची गतीदेखील कमी आढळते, जी तापमान कमी ठेवण्यास पूरक व महत्त्वाचा भाग ठरते. हा वेग फक्त चार ते पाच किमी प्रतितास असा आहे. 

पूर्वीपासून मुबलक पाणीसाठा असलेल्या निफाडला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. गोदावरी, कादवा, बाणगंगा या मुख्य नद्यांबरोबरच कालव्यांच्या सिंचनामुळे जमिनीत मोठा पाणीसाठा होतो. तो जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास उपयोगी ठरतो. परिणामी, हवेचे तापमानदेखील घटते. आकाश निरभ्र असल्याने दिवसा जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता लवकर हवेत फेकली जाते आणि जमिनीलगतचे तापमान वेगाने घटते. त्यातूनच थंडी वाढते, अशी अनेक महत्त्वाची कारणे प्रा. जोहरे यांनी सांगितली.