Mon, Jun 01, 2020 08:50होमपेज › Nashik ›   नाशिकमधील अडीच हजार लघुउद्योग संकटात

  नाशिकमधील अडीच हजार लघुउद्योग संकटात

Published On: Aug 23 2019 1:33AM | Last Updated: Aug 22 2019 11:41PM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक औद्योगिक क्षेत्राची ‘मदर इंडस्ट्री’ समजल्या जाणार्‍या बॉश, सीएट व महिंद्रा या मोठ्या कंपन्यांमध्ये ‘ले-ऑफ’ सुरू असल्याने तब्बल अडीच हजार लघुउद्योग अडचणीत आले आहेत. तर 80 हजारांपेक्षा अधिक कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. 

सातपूर, अंबड, सिन्‍नर, दिंडोरी, गोंदे, वाडीवर्‍हे यासह जिल्ह्यातील इतर उद्योग वसाहतींमधील वाहन उद्योगांवर मंदीचे सावट स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या महिन्यात बॉश कंपनीने तब्बल आठवडाभर उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा 26 ते 31 ऑगस्टदरम्यान देशभरातील सर्वच प्रकल्प बंदचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने एसयूव्ही 300 साठी एक विभाग सोडता इतर विभागांमध्ये ‘ले-ऑफ’ आणि ‘इन-आउट’ सुरू केले आहे. तर सीएट कंपनीनेही बंदचेच धोरण स्वीकारल्याने या कंपन्यांवर अवलंबून असलेले अनेक लघु उद्योग सध्या चिंतेच्या गर्तेत सापडले आहेत. या मोठ्या कंपन्या कुठलेही आधुनिक वाहन तयार करताना चेसीस, इंजिन व बॉडीसह विविध प्रकारचे बाराशेपेक्षा अधिक छोटे-मोठे पार्ट ऑउटसोर्सिंग करतात. मात्र, आता उत्पादन बंदचाचनिर्णय घेतला जात असल्याने, व्हेंडरसह इतर लघु उद्योगाचा रोजगार पूर्णत: ठप्प झाला आहे.  दरम्यान, वाहन उद्योगातील मंदीमुळे या सर्व मोठ्या कंपन्यांनी जोपर्यंत स्टॉकमधील उत्पादने विकली जात नाहीत, तोपर्यंत नवीन उत्पादनांना ब्रेक लावला आहे. सध्या बहुतांश ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये नवीन टेक्नॉलीजीचे बीएसयू-6 इंजिन असलेल्या गाड्या तयार करण्यासाठी त्या-त्या प्रकल्पात तंत्रज्ञान अपग्रेड करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, या तंत्रज्ञानाने बनविल्या जाणार्‍या वाहनांची रूपरेषा काय असेल याविषयी अद्यापपर्यंत पूर्णत: अनभिज्ञता असल्याने कंपन्यादेखील कुठलीही जोखीम उचलण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. 

बॉशचे उत्पादन बंद

बॉश ग्रुपने 16 ऑगस्टपासून पुढे साधारणत: आठवडाभर उत्पादन बंद ठेवल्यानंतर आता पुन्हा एकदा 26 ते 31 ऑगस्टदरम्यान नाशिक, पुण्यासह देशभरातील वाहन उद्योगाशी संबंधित पार्टचे उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

सहा महिन्यांपासून कामगार कपात

गेल्या सहा महिन्यांपासून बॉश कंपनीत कामगारकपात सुरू आहेत. तसेच इन-आउटही म्हणजेच कंपनीत काम नसेल तर त्या विभागातील कायम तत्त्वावर असलेले कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर येऊन केवळ आपले कार्ड पंचिंग करून घरी परतात. 

महिंद्राला रोज पाचशे कोटींचा फटका

महिंद्रामध्ये दररोज विविध प्रकारच्या सुमारे 530 पेक्षा अधिक गाड्यांचे उत्पादन केले जाते. त्यामध्ये मरॉझो, स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही-300, बोलेरो या गाड्यांचा समावेश आहे. आठ दिवस कंपनी बंद ठेवल्याने 530 गाड्यांप्रमाणे सुमारे चार हजार 240 गाड्यांचे उत्पादन कमी झाले आहे. याचाच अर्थ गाड्यांच्या किंमतीचा सरासरी अंदाज घेतल्यास दरदिवसाला महिंद्रला सुमारे पाचशे कोटींचा दिवसाला फटका बसला आहे.