Tue, Jun 02, 2020 14:37होमपेज › Nashik › जिल्ह्यात संततधार

जिल्ह्यात संततधार

Published On: Jul 30 2019 1:37AM | Last Updated: Jul 30 2019 1:37AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी (दि.29) पावसाचा जोर कायम असून, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आदी तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नाशिक शहर व परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सततच्या पावसामुळे गंगापूर 83 टक्के भरल्याने धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरीला पूर आला. तर दारणा, नांदूरमध्यमेश्वरमधून  मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात सकाळी 8 ते  सायं 4 या काळात 391.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाने ठाण मांडले आहे. सोमवारी (दि.29) पावसाचा जोर अधिक वाढला.

येवला वगळता जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. नाशिक शहर व उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाचा जोर अधिक होता. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. तर आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे आणि चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, गोदावरीला पूर आल्याने रामकुंड आणि गोदाघाट पाण्याखाली गेला. त्यामुळे पंचवटी परिसरासह काठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. जिल्ह्यात दिवसभर 391.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सुरगाण्यात सर्वाधिक 96 मिमी पाऊस झाला. पेठमध्ये 64 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 

दोन दिवस इशारा

दुष्काळग्रस्त चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव तालुक्यात दिवसभर रिमझिम सरी कोसळल्या. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.