Sun, Jan 17, 2021 05:39
तपासचक्र- अनैतिक संबंधात ठरला अडसर, प्रियकराने भिंतीवर डोके आपटून मुलाला संपवलं, पण शवविच्छेदनातून उघडकीस आणले बिंग

Last Updated: Jan 13 2021 3:16PM

file photoनाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच आईच्या चेहऱ्यावर दु:खाऐवजी भय उमटले आणि रुग्णालयात मृत मुलाला टाकून माता दिसेनाशी झाली. ही बाब जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या अनुभवी नजरेतून सुटली नाही. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तसेच मुलाचे शवविच्छेदन करताच आईच्या बेपत्ता होण्यामागचे कारणही स्पष्ट झाले. (Nashik police revealed five year old baby murder mystery)

वाचा : तपास चक्र- मुलाला चॉकलेट देऊन लावला खुनाचा तपास, जालना पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांचे तपासात कौशल्य

२२ डिसेंबर २०२० रोजी एक माता पाच वर्षीय चिमुकल्यास हातात झोपवून जिल्हा रुग्णालयात घेऊन आली. डॉक्टरांनी प्राथमिक चौकशीत आईकडे मुलाला काय झाले याबाबत विचारपूस केली. घराबाहेर खेळता खेळता मुलाच्या डोक्यास दुखापत झाल्याचे आईने डॉक्टरांना सांगितले. मुलाच्या डोक्यास अंतर्गत दुखापत झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी मुलावर उपचार सुरु केले, मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. ही बाब समजताच मुलाची आई भयभीत झाली. तिने कोणालाही न सांगता रुग्णालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे डॉक्टर संभ्रमात पडले तसेच त्यांच्या मनात शंकेची पालही चुकचुकली. त्यांनी तातडीने याची माहिती आडगाव पोलिसांना दिली तसेच मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासास सुरुवात केली. प्राथमिक तपासात आईने रुग्णालयात मुलाचे चुकीचे नाव सांगितल्याचे आढळून आले. त्यामुळे संशयास अधिक बळ मिळाले. पोलिसांनी पळून गेलेल्या आईचा शोध सुरु केला. दरम्यान, दुसरीकडे मुलाचा शवविच्छेदनाचा अहवाल आला. त्यात मुलाला मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मारहाणीत मुलाचा झालेला मृत्यू आणि आई बेपत्ता होण्याचे समीकरण पुरेसं बोलकं होतं.

वाचा : तपास चक्र - अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या मुलाला आईनं प्रियकराच्या मदतीनं संपवलं; पण सारवलेल्या अंगणाने फोडली गुन्ह्याला वाचा...

पोलिसांनी तातडीने तपास मोहिम राबवली. महिलेने रुग्णालयात मुलाचे चुकीचे नाव व पत्ता सांगितला होता. पोलिसांनी शहरात शोध मोहिम राबवून महिलेचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यावर पोलिसांनी संपर्क केला असता मोबाइल बंद आढळला. त्यामुळे पोलिसांनी शहरातील पंचवटी परिसरात शोधमोहीम सुरु केली. त्यात एका महिलेने संशयित महिलेच्या आईची माहिती दिली. पोलिसांनी महिलेच्या आईच्या गावी जाऊन महिलेबाबत विचारपूस केली असता तिने सांगितले की, मुलीचे घनशाम सोबत लग्न झाले होते. त्यामुळे पोलिसांनी घनशाम यांचा शोध घेत चौकशी केली. त्यांनी मृत मुलाचा फोटो दाखवला असता घनशाम यांनी मुलाचा फोटो ओळखला. तसेच माझी पत्नी सुलोचना हिच्यासोबत फारकत झाली असून तीन महिन्यांपूर्वीच तिने मुलाचा ताबा घेतल्याचे घनशाम यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस पुन्हा तिचा शोध घेण्यासाठी शहरात आले. सुलोचना ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने तिचा निश्चित पत्ता लागत नव्हता. अखेर तिचे घर शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सुलोचनाला ताब्यात घेत तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने सुरुवातीस उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. मुलाचा मृत्यू खेळताना पडल्याने दुखापत होऊन झाल्याचा पवित्रा घेतला. मात्र रुग्णालयात चुकीचे नाव का सांगितले, मुलाचा मृतदेह ताब्यात न घेता पळ का काढला असे प्रश्न विचारताच सुलोचना गोंधळली.

वाचा : तपास चक्र - बायकोची छेड काढली म्हणून मित्राला संपवलं, मृतदेहाच्या शर्टात दगड सापडल्यानंतर तपासाची सुत्रे अशी फिरली?

पोलिसांनी तिला विश्वासात घेत त्या दिवशी नेमके काय घडले ते विचारले. त्यानुसार तीन सांगितले की, तिच्या पतीसोबत फारकत घेऊन ती एकटीच राहत होती. दरम्यान, तिचे प्रेमसंबंध सोमनाथ कुऱ्हाडे या युवकाशी जुळले. त्यामुळे दोघेही एकत्र राहत होते. सुलोचना रात्री नोकरीनिमित्त घराबाहेर जात असल्याने मोहित रात्री रडत असे. त्यावेळी सोमनाथ त्याला बेल्टने मारत असते. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा दोघांना संबंधात अडसर वाटत होता. २१ डिसेंबरलाही सोमनाथने रात्री मुलाला बेदम मारहाण केली. तसेच भिंतीवर मुलाचे डोके आपटले. यात गंभीर दुखापत झाल्याने मुलगा बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याने सुलोचनाला फोन करुन ही बाब सांगितली. दुसऱ्या दिवशी सुलोचना सकाळी घरी गेली व तिने मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करुन तेथून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी सोमनाथलाही ताब्यात घेतले. दोघांनी गुन्हा कबूल केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांनाही मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एस. तोडकर, उपनिरीक्षक धैर्यशिल घाडगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, कर्मचारी नरवडे, वाढवणे, खुळे, जाधव, सुनील गांगुर्डे, विजयकुमार सुर्यवंशी, दशरथ पागी, मोरे, साबळे, परदेशी आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत दोघांनाही पकडले.

वाचा : १ कोटीच्या विम्यासाठी बायकोने नवऱ्याला संपवले; सतर्क पोलिस आणि विमा कंपनीमुळे 'असा' लागला तपास