Wed, Jun 03, 2020 08:10होमपेज › Nashik › नाशिक : कॅशिअर लुट प्रकरणाचा मास्टरमाईंड निघाला पेट्रोलपंपावरील कामगार

पेट्रोलपंपावरील कामगारच कॅशिअर लुटीचा मास्टरमाईंड

Published On: May 14 2019 6:36PM | Last Updated: May 14 2019 6:26PM
मालेगाव : प्रतिनिधी

चंदनपुरी शिवारात पेट्रोल पंपावरील कॅशिअर लुटीचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड त्या पंपावरील कामगार निघाला असून, त्याच्यासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर एक साथीदार फरार झाला आहे. या लुटीतले ७० हजार रुपयांसह दुचाकी, टॅब हस्तगत करण्यात आला आहे.

चंदनपुरी शिवारातील सावकार पेट्रोल पंपावरील कॅशिअर राहुल पारख हे २१ मार्च रोजी रात्री दिवसभराच्या हिशेबाचे २ लाख ८० हजार रुपये मालकाकडे सुपूर्द करण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मन्सुरा कॉलेज रोडवरील शेतकी कॉलेज परिसरात दोघां अज्ञातांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग आणि टॅब पळवून नेला होता. याप्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

याप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने सर्वत्र तपास सुरू केला. खबर्‍यांमार्फत तो सुजन थिएटरजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने मोसमपूल ते मनमाड चौफुली रोडवर थिएटरजवळ सापळा रचला. संशयित शेख अझरुद्दीन शेख शहाबुद्दीन (वय २०, रा. म्हाळदे शिवार, मालेगाव) हा दुचाकीवरुन येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. 

यानंतर पोलिस ठाण्यात त्याने युसूफ भुर्‍या (पूर्ण नाव माहिती नाही) याच्यासमवेत कॅशिअरला लुटल्याची कबुली दिली. हा सर्व प्लॅन त्याच पेट्रोलपंपावरील कर्मचारी अंकुश बापू वाघ (वय २२, रा. कुंजर, चाळीसगाव, हल्ली रा. चंदनपुरी शिवार) यांच्या माहितीवरुन हा कट रचल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शेख अझरुद्दीन व वाघला अटक करण्यात आली. तसेच तिघांनी लुटीची रक्कम एकमेकांमध्ये वाटून घेतली होती. त्यापैकी ७० हजार रुपये, चोरीचा टॅब, दुचाकी असता १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले, पोलीसनाईक राकेश उबाळे, देवा गोविंद, फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, रतिलाल वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.